मक्याचे दाणे वेगळे करणारे यंत्र विकसित
मका पिकातील सगळ्यात कंटाळवाणे काम कोणते
असेल, तर ते म्हणजे कणसावरील आवरण बाजूला करून, त्यातील मक्याचे दाणे
वेगळे करण्याचे. हे काम बहुतांश ठिकाणी महिलांकडे असते. काढणीनंतर
करायच्या प्रमुख कामातील हे काम पूर्वी हाताने केले जात असे. त्यासाठी
हाताच्या साह्याने चावण्याची छोटी यंत्रे विकसित करण्यात आलेली आहेत.
त्यामुळे महिलांवरील या कामाचा भार थोडासा हलका झाला असला तरी त्यासाठी
अधिक ताकद लागत असल्याने कमी प्रमाणात मक्याचे दाणे वेगळे करता येत होते.
त्यातही कणसावरील आवरण काढण्याचे काम हातानेच करावे लागत असे. मात्र
भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या भुवनेश्वर (ओडिशा) येथील महिलांसाठी कृषी
संशोधन संचालनालयाने पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही सहजतेने वापरता येईल,
असे मक्याचे कणीस सोलण्याचे यंत्र विकसित केले आहे.
..अशी आहेत या यंत्राची वैशिष्ट्ये
- हे यंत्र दोन व्यक्तींच्या साह्याने चालवता येते. त्यामध्ये एकामागोमाग एक अशी मक्याची कणसे आत टाकावी लागतात.
- पुरुष या यंत्रावर काम करत असताना, या यंत्राच्या क्रॅंकशाफ्टचा वेग 57 (फेरे प्रति मिनिट) आरपीएम ठेवला जातो. त्यामुळे प्रति तास 89.6 किलो दाणे मक्याच्या कणसापासून मिळतात.
- स्त्रिया या यंत्रावर काम करत असताना क्रॅंकशाफ्टचा वेग हा 52 (फेरे प्रति मिनिट) आरपीएम ठेवला जातो. त्यामुळे महिलांनाही हे काम करताना ताण येत नाही. सहजतेने काम करता येते. या वेगाने काम केल्यास प्रति तास 63.4 किलो दाणे वेगळे करता येतात.
- या यंत्रामुळे हाताच्या साह्याने कणीस सोलणे, दाणे वेगळे करण्यापेक्षा 48.9 टक्के वेळ कमी लागतो.
- नळीच्या आकाराच्या मका सोलणी यंत्रापेक्षा 38.7 टक्के वेळ कमी लागतो.
- हे उपकरण 370 वॉट सिंगल फेज इलेक्ट्रिक मोटरवर चालते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
महिलांसाठी कृषी संशोधन संचालनालय,
भारतपूर स्क्वेअर, नंदन कानन खांदागिरी रोड,
बारामुंडा, भुवनेश्वर- 751003, ओडिशा.
फोन : 0674-2386940, २३८६२४१
स्त्रोत: अग्रोवन
0 comments:
Post a Comment