क्रीम सेपरेटर, पाश्‍चरायझर यंत्र

क्रीम सेपरेटर, पाश्‍चरायझर यंत्र



क्रीम सेपरेटर

दुधातील स्निग्धांश वेगळे करण्यासाठी दूध प्रक्रिया उद्योगात क्रीम अथवा मलई सेपरेटर वापरतात.
या यंत्राने पाच लिटर प्रति तास ते एक लाख लिटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने दुधातील मलई वेगळी करता येते. यंत्राचा बहुतांश भाग स्टेनलेस स्टीलचा बनलेला असून, काही भाग एमएस या धातूचा बनलेला असतो. यंत्र चालवण्यासाठी 0.5 एचपी ते विविध एचपी असलेल्या क्षमतेच्या इलेक्‍ट्रिक मोटारचा वापर करण्यात येतो. या यंत्रामध्ये एका बाजूने दूध टाकले जाते, तर दुसऱ्या बाजूकडून मलई व स्किम मिल्क (स्निग्धांशविरहित दूध) मिळवता येते. यंत्रामधून पाहिजे असेल तेवढ्याच फॅटचे दूध आपल्याला मिळवता येते. यंत्राची किंमत क्षमतेनुसार अंदाजे बारा हजार रुपयांपासून पुढे आहे.

बॅच पाश्‍चरायझर

दुधाची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी दूध निर्जंतुक करणे आवश्‍यक असते. त्यासाठीची प्रभावशील प्रक्रिया म्हणजे दुधाचे पाश्‍चरायझेशन किंवा दूध तापवणे. या प्रक्रियेत दूध 72 अंश सेल्सिअस तापमानावर 15 सेकंदांसाठी किंवा 63 अंश सेल्सिअस तापमानावर 30 मिनिटे तापवून थंड करण्यात येते. असे दूध पिण्यास सुरक्षित असते. दूध तापवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बॅच पाश्‍चरायझर (एलटीएलटी) किंवा प्लेट पाश्‍चरायझर (एचटीएसटी) चा वापर सर्वत्र होताना दिसून येतो. बॅच पाश्‍चरायझर हे उपकरण लहान स्तरावर दूध प्रक्रिया करणाऱ्या दूध उत्पादकास अत्यंत फायदेशीर आहे. या उपकरणात दूध 63 अंश सेल्सिअस तापमानावर 30 मिनिटांसाठी तापवून निर्जंतुक करता येते.
उपकरणाची क्षमता 50 ते 500 लिटर असून, यातील दूध गॅस किंवा वाफेच्या ऊर्जेवर तापवले जाते. बॅच पाश्‍चरायझर हे उपकरण गोलाकार आकारात उपलब्ध आहे. हे स्टेनलेस स्टीलच्या दुहेरी पत्र्याचे बनलेले आहे. दोन पत्र्यांदरम्यान गरम पाणी किंवा वाफ फिरवली जाऊन आतील दूध अप्रत्यक्षरीत्या गरम होते. यामुळे दुधाची करपण्याची किंवा दूध लागण्याची शक्‍यता कमी असते. तापलेले दूध याच उपकरणातून थंडदेखील करता येते. उपकरण वापरण्यास सोपे व सुरक्षित असून, दही, आइस्क्रीम, पनीर व तत्सम पदार्थ करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. उपकरणातील दूध एकसमान तापवण्यासाठी उपकरणात एक ढवळणीदेखील पुरवलेली असते.

डॉ. ज्ञानेश्‍वर पतंगे - 7588577941
कृषी महाविद्यालय, कोल्हापूर.
स्त्रोत: अग्रोवन
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment