रेशीम शेतीवर भर हवा


https://play.google.com/store/apps/details?id=com.kalyani_softwares.kalyani_eeshwari.saatbaramaharashtra
https://play.google.com/store/apps/details?id=com.kalyani_softwares.kalyani_eeshwari.newspapers
जागतिक रेशीम उत्पादनामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात रेशमाचा वापरही मोठ्या प्रमाणात आहे. असे असले तरी देशाची गरज लक्षात घेता देशांतर्गत उत्पादन पुरेशा प्रमाणात नसल्याचे प्रतिपादन डॉ. एस. एम. एच. कादरी यांनी केले आहे. बायव्होल्टाईन रेशीम कीटक संगोपनावर भर देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. कादरी हे म्हैसूर येथील केंद्रीय रेशीम मंडळाच्या केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
रेशीम शेतीतील पारंपरिक पद्धती किंवा सध्या लोकप्रिय असणाऱ्या पद्धतींचे रूपांतर अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धतीत करणे तसे सोपे नाही; मात्र जागतिक स्पर्धात्मक बाजारपेठेचा कल लक्षात घेता त्याकडे वळणे गरजेचे झाले आहे, असे प्रतिपादन डॉ. कादरी यांनी केले आहे. ते म्हणाले, की सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे रेशीम तयार करायचे असेल, तसेच शेतकऱ्यांचेही उत्पन्न वाढवायचे असेल तर भारतीय रेशीम उद्योगाने आता संकरित बायव्होल्टाईन पद्धतीच्या रेशीम शेतीवर भर द्यायला हवा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ स्पर्धा करण्यासाठी ते गरजेचे आहे. त्या दृष्टीने आमच्या संस्थेने अधिक उत्पादन देणाऱ्या तसेच रेशमाची उत्तम गुणवत्ता असलेल्या रेशीम कीटकांच्या संकरित जाती उपलब्ध केल्या आहेत.
डॉ. कादरी म्हणाले, की सुरवातीला बायव्होल्टाईन जातींचे संगोपन उष्णकंटिबंधीय परिसरात केवळ हिवाळ्यात होत असे; मात्र सर्व हवामानाला सुसंगत असणाऱ्या जातींची निर्मिती आपल्या शास्त्रज्ञांनी आता केली आहे. जागतिक बॅंकेच्या मदतीने अनेक राष्ट्रीय रेशीम शेती प्रकल्प सध्या सुरू आहेत. बायव्होल्टाईन रेशीम शेती तंत्रज्ञानाला प्रोत्साहन तसेच लोकप्रियता देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
डॉ. कादरी याविषयी अधिक विवेचन करताना म्हणाले, की संकरित बायव्होल्टाईन शेतीमध्ये तमिळनाडू राज्याने देशात आघाडी घेतली आहे. राज्यातील काही ठराविक भागात किंवा जिल्ह्यात रेशीम प्रकल्पांतर्गत यश मिळाले असले तरी अद्याप अनेक रेशीम उत्पादकांपर्यंत त्याची परिणामकारकता पोचणे बाकी आहे. सालेम येथील प्रादेशिक संशोधन केंद्र तसेच रेशीम संचालनालय यांनी बायव्होल्टाईन तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी पावले टाकली आहेत. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून त्याच्या शेतीत 0.1 टक्‍क्‍यापासून 22 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या साक्षरतेतही वाढ झाली आहे. रेशीम उद्योग हे रोजगाराचे साधन बनले आहे. तमिळनाडूतील शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत.

रेशीम उद्योगात संधी

म्हैसूरच्या या संस्थेतर्फे तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आदी विविध राज्यांत बायव्होल्टाईन तंत्रज्ञानासाठी पुढाकार घेतला जात आहे. त्यासाठी क्षेत्रविकास उत्तेजन कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. यासंबंधीच्या विस्तार साह्यासाठी व्हिडिओ कॉन्फरसिंगसारखी सेवा सुरू करण्यात आली आहे. रेशीम उद्योगाच्या विकासासाठी अद्याप बराच वाव आहे. त्यातून स्वयंरोजगाराच्या संधीही वाढणार आहेत अशी आशाही डॉ. कादरी यांनी व्यक्त केली आहे.

बायव्होल्टाईन शेतीत यशस्वी झालोय

मनुपट्टी गावातील एम. एस. वासुदेवा रामकुमार हा रेशीम उत्पादक आपले अनुभव सांगताना म्हणाला, की अळ्यांना रोगांचा धोका संभवतो, त्यांना दर्जेदार तुती पाल्याचीच गरज लागते असे मला वाटत होते. त्यामुळे बायव्होल्टाईन रेशीम कीटक संगोपनाकडे वळण्यास अनुत्सुक होतो. मात्र शास्त्रज्ञ माझ्या मदतीस धावून आले. त्यांनी रोग व तापमान सहनशील अशा संकरित रेशीम कीटकांच्या जाती मला उपलब्ध करून दिल्या. आता ही शेती मी यशस्वीपणे करीत असून प्रति एकर सहा ते दहा हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मला मिळू लागले आहे.
सी.एस.आर. बायव्होल्टाईन वाण
सी.एस.आर.-4 - हा वाणदेखील दुबार मूळ वाण असून, म्हैसूर येथेच विकसित केला आहे.
सी.एस.आर.-3, सी.एस.आर.-5
सी.एस.आर.-6, सी.एस.आर.-12, सी.एस.आर. 16
सी.एस.आर.-17 हे देखील दुबार  वाण आहे.
सी.एस.आर.-18 -
या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे इतर वाणाच्या तुलनेत अळी अवस्था कालावधी एक दिवसाने कमी असून, सदरचा वाण जास्त तापमान (36 अंश से.) व जास्त आर्द्रतेत (85 टक्के) विकसित केलेला आहे.
सी.एस.आर. 19
हाही वाण वरीलप्रमाणेच विकसित केलेला आहे. सी.एस.आर.-48 - अति तलम व मुलायम रेशीम वस्त्र निर्मितीसाठी या वाणाची निर्मिती केली गेली. या वाणाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे रेशीम धाग्याची जाडी (डेनिअर) कमी आहे. या वाणाच्या कोषांपासून 3अ - 4अ दर्जाच्या रेशीम धाग्याची निर्मिती होते. कोषातील धाग्याची लांबी 1500 मीटरपेक्षा जास्त आहे. कवच टक्केवारी 22.23 टक्के आहे.
स्त्रोत: अग्रोवन
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment