संकरित नेपिअरची लागवड

जनावरांच्या समतोल आहारामध्ये वैरण, हिरवा चारा, आंबवण, खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे, पाणी यांचा समावेश होतो. त्यात सुमारे 70 टक्के भाग हा हिरवा चारा असतो. त्यामुळे लुसलुशीत व पौष्टिक चाऱ्याचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी संकरित नेपिअर हे बहुवार्षिक गवत महत्त्वाचे ठरते.
सर्वसाधारणपणे पूर्ण वाढलेल्या दुभत्या जनावराला दिवसाला 24 ते 25 किलो हिरवा चारा आणि 5 ते 6 किलो कोरडा चारा लागतो. समतोल आहाराच्या दृष्टीने एकदल व द्विदल चाऱ्याचे प्रमाण निम्मेनिम्मे असावे. 12 ते 13 किलो एकदल वर्गीय हिरवा चारा (उदा. ज्वारी, बाजरी, मका, ओट, संकरित नेपिअर इ.) तर 12 ते 13 किलो द्विदल वर्गीय हिरवा चारा (उदा. लसूण घास, बरसीम, चवळी इ.) यांचा समावेश करावा. एकदल चाऱ्यामध्ये शर्करेचे प्रमाण जास्त असते, तर द्विदल चाऱ्यामध्ये प्रथिने, कॅल्शिअम यांचे प्रमाण जास्त असते.

जमिनीची निवड

  • संकरित नेपिअर (फुले जयवंत) हा वाण सर्व प्रकारच्या जमिनीत वाढतो. तथापि खोल, मध्यम ते भारी, काळी कसदार उत्तम निचऱ्याची सुपीक गाळ फेरातील जमिनीची निवड करावी. यामुळे गवताची वाढ जोमाने होऊन फुटवे चांगले येतात. भरपूर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. हा वाण 5 ते 8 सामू असलेल्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढू शकतो.
  • हवामान - हे गवत 24 अंश ते 40 अंश सेल्सिअस या तापमानात चांगले वाढते. 15 अंश सेल्सिअसपेक्षा खाली तापमान गेल्यास या गवताची वाढ खुंटते.
  • उन्हाळ्यात व पावसाळ्यात या गवताची वाढ अत्यंत उत्कृष्ट होते. पावसाच्या हलक्‍या सरी व त्यानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश या वाणाच्या वाढीकरिता हितावह असतो.
  • हिवाळ्यात हे गवत सुप्त अवस्थेत राहते. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.
  • सिंचनाची सोय असल्यास व खते योग्य प्रमाणात वापरल्यास या गवताची लागवड तीन वर्षांपर्यंत टिकते.
  • पूर्वमशागत - जमिनीची खोल मशागत करून, कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या वेळी हेक्‍टरी 10 टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.
  • लागवडीचा हंगाम - या गवताची लागवड उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या काळात करावी. खरीप हंगामात (पावसाळ्यात) जून ते ऑगस्ट मध्येही लागवड करता येते.

लागवडीची पद्धत


  • या गवताची ठोंबे (मुळासह) लावावीत. लागवडीकरिता साधारणपणे तीन महिने वाढू दिलेल्या गवताच्या खोडाचा जमिनीकडील दोन तृतीयांश भागातील दोन ते तीन डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावाव्यात.
  • या गवताची लागवड 90 x 60 सें.मी. अंतरावर करावी. गवताचे ठोंब 90 सें.मी. अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत मुळासहित गवताची ठोंब अथवा डोळे असणाऱ्या कांड्याद्वारे लागवड करावी.
  • दोन डोळे जमिनीत व एक जमिनीवर राहील अशा पद्धतीने लागवड करावी. दोन झाडांमध्ये 60 सें.मी. अंतर ठेवावे. एका ठिकाणी एक जोमदार ठोंब लावल्यास हेक्‍टरी 18,500 ठोंब पुरेसे होतात.

  • खत व्यवस्थापन


  • लागवडीच्या वेळी प्रति हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे, तसेच प्रत्येक कापणीनंतर 25 किलो नत्र प्रति हेक्‍टरी द्यावे.

  • पाणी व्यवस्थापन - संकरित नेपिअर गवताला उन्हाळी हंगामात 7 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. खरीपमध्ये गरजेनुसार 15 दिवसांचे अंतराने, हिवाळ्यात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
    आंतरमशागत - सुरवातीच्या वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्‍यक आहे. त्यानंतरची खुरपणी गरजेनुसार करावी. दरवर्षी उन्हाळ्यात चाळणी (खांदणी) करून मातीची भर झाडास द्यावी. प्रत्येक वर्षी एक ठिकाणी 2 ते 3 फुटवे ठेवून इतर जादा फुटवे लागवडीकरिता नवीन ठिकाणी वापरावेत. यासाठी मर झालेले फुटवे पुंजक्‍यातून काढून टाकावेत. जोमदार 2 ते 3 फुटव्यांना वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करावे.

    कापणी व उत्पादन

    या गवताची हिरव्या चाऱ्यांसाठी पहिली कापणी 60 ते 65 दिवसांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण 15 ते 20 सें.मी. उंचीवर केल्यास फुटवे चांगले फुटण्यास मदत होते. नंतरच्या कापण्या पीकवाढीनुसार 45 ते 50 दिवसांनी कराव्यात. अशा प्रकारे वर्षभरात 6 ते 7 कापण्या घेता येतात.
    • कापणीस उशीर झाल्यास गवत जास्त वाढते. त्यामुळे ते जाड टणक व जास्त तंतुमय होते. पौष्टिकतेचे प्रमाण कमी होते. शिवाय कापण्यांची संख्याही कमी होते.
    • शक्‍यतो कडबा कुट्टीमध्ये गवत बारीक करून द्यावे.
    • साधारणपणे प्रतिवर्षी 100 ते 150 टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.

    सुधारित वाणाविषयी अधिक माहिती

    महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील गवत संशोधन प्रकल्पाने संकरित नेपिअर गवताचे "फुले जयवंत' (आर.बी.एन.-13) हे वाण विकसित केले आहे.
    • "फुले जयवंत' वाणाच्या हिरव्या चाऱ्यात ऑक्‍झिलिक आम्लाचे प्रमाण हे 1.91 टक्के आहेत.
    • त्यात प्रथिने 10.35 टक्के, स्निग्ध पदार्थ 2.38 टक्के, खनिजे 12.32 टक्के, तसेच चाऱ्याची एकूण पचनीयता 61.8 टक्के आहे.
    • तसेच पानांवर कूस कमी प्रमाणात असल्याने जनावरे आवडीने खातात.

    संपर्क - डॉ. सिनोरे, 9423732876
    (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
    स्त्रोत: अग्रोवन
    SHARE
      Blogger Comment
      Facebook Comment

    0 comments:

    Post a Comment