चिकूपासून पावडर, बर्फी, चटणी | chikoo powder, barfi, chutney | Sheti purak vyavsay in marathi

चिकूमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, 5.3 ते 7.4 मिलिग्रॅम तंतुमय पदार्थ आणि जीवनसत्त्व क असते. नोव्हेंबर महिन्यापासून जास्त प्रमाणात चिकू फळांची आवक होते, हे लक्षात घेऊन बाजारपेठेच्या मागणीनुसार चिकूपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करावेत.


चिकू चिप्स

साहित्य - पिकलेले चिकू 
  • चांगले चिकू वेचून घ्यावेत किंवा पिकलेले चिकू घ्यावेत.
  • स्टेनलेस स्टीलच्या चाकूच्या साह्याने चिकूची साल काढून घ्यावी.
  • चिकूचे दोन भाग करून त्यातील मधला पांढरा भाग व बिया काढून घ्याव्यात.
  • त्यानंतर चिकूचे पातळ काप करावेत.
  • हे काप सोलर ड्रायर (वाळवणी यंत्रामध्ये) तीन दिवस वाळवावे.
  • कडकडीत वाळवलेले चिकू चिप्स हवाबंद डब्यात भरून ठेवावे.



    चिकू पावडर

    साहित्य - चिकू चिप्स 
    • कडकडीत वाळवलेले चिकू चिप्स घ्यावेत.
    • त्यानंतर ग्राइंडरच्या साह्याने वाळलेल्या फोडींची भुकटी करावी.
    • तयार झालेली भुकटी 250 गेजच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सीलबंद करून साठवून ठेवावी.
    • चिकू पावडरपासून पेय तयार करता येते. त्यासाठी चिकूची भुकटी दुधामध्ये 1ः20 या प्रमाणात मिसळून ढवळावी. त्यानंतर त्यामध्ये साखर मिसळून चिकू मिल्कशेक तयार करावा.

      चिकू खोबरा बर्फी

      साहित्य - 
      चिकूचा लगदा - 1 वाटी 
      खोवलेला नारळ - 1 वाटी 
      साखर - 1 ते 2 वाटी 
      दूध - 1 वाटी 
      तूप - 2 चमचे 
      कृती - 
      • एक पसरट भांड्यात तूप घेऊन त्यात नारळ चांगला भाजून घ्यावा.
      • नंतर त्यात साखर व चिकूचा लगदा मिसळून ते मिश्रण चांगले घोटावे.
      • घोटत असतानाच एक वाटी सायीचे दूध त्यात मिसळावे. त्यानंतर हे मिश्रण एकजीव होऊन घट्टपणा येईल तोपर्यंत घोटत राहावे.
      • मिश्रण घट्ट झाल्यावर एका ताटाला तूप लावून त्यात तो लगदा पसरावा. चांगले थापून थोड्या वेळाने त्याच्या वड्या पाडाव्यात.
      • या वड्या चिकूच्या नैसर्गिक रंगामुळे चांगल्या दिसतात व चविष्ट लागतात.

      चिकू चटणी

      साहित्य- 
      पिकलेले चिकू - 2 
      हिरव्या मिरच्या - 2 ते 3 
      लसूण पाकळ्या - 3 ते 4 
      कोथिंबीर - गरजेप्रमाणे 
      चिंच - गरजेप्रमाणे 
      मीठ व जिरेपूड - चवीप्रमाणे 
      कृती - 
      • चिकू सोलून त्याचे तुकडे करावेत. त्यातील बिया काढून घ्याव्यात.
      • वरील सर्व साहित्य चिकूमध्ये मिसळून मिक्‍सरमध्ये चटणी वाटून घ्यावी.

      चिकू नारळ लाडू

      साहित्य - 
      चिकू पावडर - 1 वाटी 
      सुके खोबरे - 1 वाटी 
      रवा - 1 वाटी 
      दळलेली साखर - 1 वाटी 
      वेलचीची पावडर - 1 लहान चमचा 
      तूप - दीड वाटी 
      चारोळी - 20 ते 25 दाणे 
      बेदाणे - 10 ते 15 
      कृती - 
      • प्रथम रवा तुपात भाजून घ्यावा.
      • सुके खोबरे किसून, भाजून व वाटून घ्यावे.
      • नंतर एका भांड्यात भाजलेला रवा, भाजलेला खोबरे कीस, चिकू पावडर, साखर व इतर सर्व साहित्य एकत्र करावे. उरलेले तूप तापवून त्यात मिसळावे.
      • आपल्या आवडीप्रमाणे छोटे-मोठे लाडू बनवून घ्यावेत.
      • हे लाडू पौष्टिक असतात.

      चिकू स्क्वॅश

      साहित्य -
      चिकू लगदा - 1 किलो (10 ते 12 फळे) 
      साखर - 1 किलो ( 5 मध्यम कप) 
      पाणी - 1 लिटर (5 मध्यम कप) 
      सायट्रिक आम्ल - 40 ग्रॅम 
      कृती - 
      • चिकूच्या फोडी मिक्‍सरमध्ये घालून चांगला लगदा तयार करून घ्यावा.
      • हा लगदा जाडसर कापडात बांधून घेऊन त्यातला रस काढून घ्यावा.
      • चिकूचा लगदा, साखर, पाणी व सायट्रिक आम्ल हे सर्व घटक एकत्र करून त्यांचे चांगले घोटून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे.
      • तयार झालेल्या मिश्रणात पोटॅशियम मेटाबायसल्फेट 600 मिलिग्रॅम प्रति किलो किंवा सोडियम बेंझोएट 710 मिलिग्रॅम प्रति किलो प्रमाणात मिसळावे किंवा तयार स्क्वॅश 80 ते 82 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत 25 मिनिटे गरम करून साठवावा.
      • तयार स्क्वॅश भरलेले कॅन किंवा बाटल्या साध्या पाण्याखाली धरून थंड कराव्यात. बाटल्यांमध्ये साठविलेला स्क्वॅश थंड कोरड्या जागेत ठेवावा, म्हणजे स्क्वॅश 6 महिन्यांहून अधिक काळ टिकतो.

      चिकू जॅम

      साहित्य -
      चिकू लगदा - 2 किलो (25 फळे)
      साखर - 2 किलो (6 ते 8 मध्यम कप) 
      पाणी - 250 मिलि (1 मध्यम कप) 
      सायट्रिक आम्ल - 15 ते 18 मिलिग्रॅम 
      कृती -


      • चिकू स्क्वॅशच्या कृतीप्रमाणे फळांची निवड करून त्यांचे तुकडे करावेत. जॅमसाठी लागणारे सर्व घटक एकत्र करून ठराविक घट्टपणा येईपर्यंत शिजवावेत. * शिजविताना मिश्रण हळूहळू ढवळावे.
      • शिजलेले मिश्रण म्हणजे जॅम गरम असतानाच कॅनमध्ये किंवा भांड्यामध्ये भरावा.
      • चांगली पक्व फळे घेऊनही जॅम घट्ट झाला नाही तर त्यात थोडी पेक्‍टिनची पावडर टाकावी.


      SHARE
        Blogger Comment
        Facebook Comment

      0 comments:

      Post a Comment