Prepare berry sauce, powder | बोरापासून तयार करा चटणी, पावडर

बोराची चटणी

चटणीसाठी किंचित पिवळसर रंगाची निरोगी बोरे निवडून त्यांचा कीस करून घ्यावा. एक किलो बोराच्या किसापासून साधारणतः 1.500 ते 1.750 किलो चटणी तयार होते. बोराची चटणी तयार करण्यासाठी बोराचा कीस - 1 किलो, साखर - 1 किलो, मिरची पूड - 20 ग्रॅम, कांदा बारीक वाटलेला - 60 ग्रॅम, मीठ - 50 ग्रॅम, लसूण बारीक वाटलेला - 15 ग्रॅम, वेलदोडे पावडर - 15 ग्रॅम, दालचिनी पावडर - 15 ग्रॅम, व्हिनेगर - 180 मिलि. हे घटक लागतात.
1) बोराच्या किसामध्ये साखर आणि मीठ मिसळून ते मिश्रण गरम करण्यास ठेवावे. सर्व मसाल्याचे पदार्थ मलमलच्या कापडाच्या पुरचुंडीमध्ये बांधून मिश्रणात सोडावेत. अधून-मधून ही पुरचुंडी थोडीशी पळीने दाबावी म्हणजे मसाल्याचा अर्क उतरण्यास मदत होईल.
2) हे मिश्रण 67 ते 69 अंश ब्रिक्‍स येईपर्यंत शिजवावे. त्यात व्हिनेगर मिसळावे. मिश्रण पुन्हा गरम करावे. गरम असतानाच ही तयार झालेली चटणी रुंद तोंडाच्या निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये भरावी. थंड झाल्यावर बाटल्या झाकणाने बंद करून कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.

बोराचे लोणचे

1) पिकलेल्या बोरांपासून उत्तम प्रकारचे लोणचे करता येते. लोणच्यासाठी वापरावयाचे तेल प्रथम उकळून थंड करावे.
2) लोणचे तयार करण्यासाठी बोराच्या फोडी 1.5 किलो, मीठ 250 ग्रॅम, खाद्यतेल 240 ग्रॅम, मेथी (मध्यम भरडलेली) 2.5 ग्रॅम, मोहरी (मध्यम भरडलेली) 100 ग्रॅम, मिरची पूड 50 ग्रॅम, हिंग 50 ग्रॅम, हळद पावडर 25 ग्रॅम, सोडियम बेन्झोएट 0.1 ग्रॅम. हे घटक लागतात.
3) प्रथम फळाचे तुकडे व मीठ सोडून बाकी सर्व पदार्थ तेलात परतून घ्यावेत. मसाला व फळांचे तुकडे एकत्र मिसळून पुन्हा दोन-तीन मिनिटे परतून घेऊन मीठ मिसळावे.
4) तयार झालेले लोणचे निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, हवाबंद करून, झाकण लावून त्या थंड व कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.

बोराचा चिवडा

1) पिकलेल्या बोरापासून उत्तम प्रकारचा चिवडा तयार करता येतो. यासाठी प्रथम निरोगी चांगली फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. नंतर किसणीच्या साह्याने त्यांचा कीस करावा. तो कीस फडक्‍यात बांधून उकळत्या पाण्यात 3-4 मिनिटे धरावा. नंतर दोन ग्रॅम गंधक प्रतिकिलो कीस याप्रमाणे दोन तास गंधकाची धुरी द्यावी. त्यामुळे चिवड्यास पिवळसर रंग प्राप्त होतो. साठवणीच्या काळात बुरशींची लागण होत नाही.
2) नंतर हा कीस ट्रेमध्ये पातळ पसरून ते ट्रे 55 अंश सें. तापमानाला 12 तास वाळवणी यंत्रात ठेवावा. पूर्ण वाळल्यानंतर तो कीस पॉलिथीनच्या पिशवीमध्ये भरून पिशव्या हवाबंद करून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.
3) वापरतेवेळी तो कीस तेलात तळून त्यामध्ये चवीनुसार मीठ, तिखट व इतर मसाले टाकून त्याचा आस्वाद घ्यावा. हा चिवडा उपवासाला देखील चालतो.

बोराची पावडर

1) बोराच्या वाळविलेला किसाची ग्राइंडरमध्ये पावडर तयार करावी. ही पावडर वस्त्रगाळ करून, वजन करून 400 गेजच्या पॉलिथीनच्या पिशवीमध्ये भरून, पिशवी हवाबंद करावी. थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. या पावडरचा उपयोग सरबत तयार करण्यासाठी होतो.
संपर्क- डॉ.गरांडे - 9850028986
( लेखक शाहू कृषी तंत्र विद्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे प्राचार्य आहेत)
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment