अ) सुधारित सच्छिद्र ड्रम -
- या पद्धतीमध्ये पत्र्याच्या ड्रमपासून 45 सें. मी. उंचीचे व 60 सें. मी. व्यासाचे चार ते पाच सच्छिद्र ड्रम 150 सें. मी. व्यासाच्या मोठ्या काहिलीमध्ये कच्ची हळद भरून ठेवतात.
- मोठ्या काहिलीमध्ये पाणी ओतून पाण्याची पातळी ड्रमच्या उंचीच्या वर पाच ते सहा सें. मी. इतकी ठेवली जाते, ड्रम गोणपाटाने झाकले जातात. या पद्धतीमध्ये हळद फक्त 24 ते 30 मिनिटांत चांगली शिजते.
- प्रत्येक वेळी काहिलीतील पाणी सोडण्याची आवश्यकता भासत नाही, त्यामुळे एक एकरची हळद दोन दिवसांत शिजून तयार होते.
- हळद शिजताना हळकुंडावरील माती काहिलीत जमा होते, त्यामुळे मातीविरहित स्वच्छ हळद मिळते.
ब) आयताकृती कुकर -
- ही पद्धत तमिळनाडू कृषी विद्यापीठ, कोईमतूर यांनी विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये 0.5 मी. x 0.7 मी. x 0.5 मी. आकाराचे सच्छिद्र ट्रे कच्च्या हळदीने पूर्णपणे भरून पाणी भरलेल्या 1.2 मी. x 0.9 मी. x 0.75 मी. आकाराच्या मोठ्या चौकोनी ट्रेमध्ये ठेवावेत.
- या पद्धतीमध्ये मोठ्या ट्रेमध्ये 3/4 भरलेल्या उकळत्या पाण्यात छोट्या ट्रेमधील हळद शिजते, त्यामुळे हळद एकसारखी शिजली जाते. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये हळद वाफेवर शिजवता येते.
सुधारित तंत्राचे फायद-
- पारंपरिक पद्धतीमध्ये हळद पाण्यामध्ये शिजविली जाते, तर या पद्धतीमध्ये हळद वाफेवर शिजवली जाते.
- या पद्धतीमध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सांगाड्यावर 2000 ते 3000 लिटर क्षमतेची पत्र्याची पाण्याची टाकी बसवलेली असते. या टाकीच्या खालच्या बाजूला लोखंडी पाइपच्या साह्याने उष्णता देण्यास जागा वाढवलेली असते, त्यामुळे पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणावर तयार होते. या पाण्याच्या टाकीला दोन व्हॉल्व्ह ठेवले असून, खालच्या व्हॉल्व्हपर्यंत कमीत कमी पाणी असावे, तर वरच्या व्हॉल्व्हपर्यंत जास्तीत जास्त पाणी भरावे. वरील 10 ते 12.5 सें. मी. जागेमध्ये पाण्याची वाफ गोळा होते. ही तयार झालेली वाफ पाइपच्या साह्याने ड्रममध्ये सोडली जाते.
- यामध्ये आवश्यकतेनुसार चार ड्रम (प्रति तास 2 टन हळद शिजविण्यासाठी), दोन ड्रम (प्रति तास 1 टन हळद शिजविण्यासाठी) किंवा न हलवता येणारे दोन ड्रमचे संयंत्र तयार करता येते.
- एका ड्रममध्ये 250 ते 300 किलो हळद बसते.
हळदीला पॉलिश करणे -
- शिजवून वाळलेल्या हळदीवरील सुरकुतलेली जाड साल आणि मातीचा थर काढून हळद आकर्षक बनवण्यासाठी हळद पॉलिश करावी. हळद कमी प्रमाणात असल्यास ती खडबडीत पृष्ठभागावर जोराने घासून किंवा जुनी पोती पायास बांधून ती हळदीवर घासावी. हळद मोठ्या प्रमाणावर असल्यास हळद पॉलिश करण्यासाठी ट्रॅक्टरचलित अथवा इलेक्ट्रिक मोटारचलित पॉलिश मशिनचा वापर करावा.
संपर्क - 0233- 2437275,2437288
कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली
कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली
-----------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अॅग्रोवन
0 comments:
Post a Comment