समृध्दीचा मार्ग - रेशीम शेती

 

 
https://play.google.com/store/apps/details?id=com.kalyani_softwares.kalyani_eeshwari.newspapers
https://play.google.com/store/apps/details?id=com.kalyani_softwares.kalyani_eeshwari.saatbaramaharashtra

प्रस्तावना

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात वेगवेगळ्या भागात भौगोलिक परिस्थीतीनुसार वेगवेगळी पिके घेतली जातात. भारतीय शेतकरी अजूनही मोठ्या प्रमाणात पारंपरिक पिके घेत असल्याचे दिसून येते. पावसाची अनियमितता, निसर्गाचा लहरीपणा, वेळेत उपलब्ध होवू न शकणारा मजूर वर्ग, बेभरवश्याची बाजारपेठ आणि कच्च्या मालाची अनिश्चितता यासर्व बाबीमुळे शेतीच्या उत्पादनावर जेवढा खर्च होतो, तेवढेही उत्पन्नही मिळत नाही. पर्यायाने शेतीवर अवलंबून राहणे दुरावास झालेले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतीवर आधारित पूरक उद्योग करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी रेशमी शेती हा एक चांगला मार्ग आहे. या रेशीम शेतीविषयी थोडक्यात माहिती...
  • रेशीम उद्योग हा शेतीला एक चांगला जोडधंदा आहे.
  • या उद्योगापासून आपणास मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होत आहे.
  • भारतात प्रामुख्याने रेशीम उद्योग हा दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे. यामध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांचा पारंपरिक रेशीम उद्योग करणारी राज्य म्हणून उल्लेख केला जातो.
  • महाराष्ट्रात देखील रेशीम उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. रेशीम उद्योग घेणाऱ्या अपारंपरिक राज्यामध्ये महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकावर आहे.
  • राज्यामध्ये एकूण 20-22 जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग शासनामार्फत राबविला जात आहे.
  • रेशीम उद्योगामध्ये रोजगाराची प्रचंड क्षमता असून ग्रामीण भागाचा कायापालट करणारा आहे.
  • एक हेक्टर बागायत तुती पासून वर्षात 666 मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होते.
  • बीड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास अत्यंत अनुकुल असून उत्पादनाची शाश्वती व धोक्यापासून हमी असणारा तसेच सध्याच्या परिस्थितीतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची प्रचंड क्षमता असणारा उद्योग आहे.
  • रेशीम उद्योग हा प्रामुख्याने तीन विभागात विभागला गेला आहे.
अ. तुती लागवड करुन तुती पाला निर्मिती करणे.
ब. रेशीम अळीचे संगोपन करुन रेशीम कोष निर्मिती करणे.
क. कोष काढणे , रेशीम कोषापासून रेशीम धागा निर्मिती करणे .

तुती लागवड करुन तुती पाला निर्मिती करणे

  • रेशीम अळीचे मुख्य खाद्य हे तुती झाडाचा पाला हे होय.
  • तुती पाला निर्मितीकरिता ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, असे शेतकरी तुती झाडाची लागवड करु शकतात.
  • तुती लागवडीकरिता जमिनीची निवड करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
  • शेताची निवड करताना प्रामुख्याने पाण्याचा निचरा होणारी, सकस काळी कसदार जमिनीची निवड करावी.
  • तुती झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी जमिनीस शेणखत व रासायनिक खतांचा वापर करणे हे अत्यंत आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर हिरवळीची खते, गांडूळ खत, इतर मायक्रोन्यटिंयटस तुती झाडांना दिल्यास तुती पानांची प्रत चांगली राहून सकस पाला निर्मिती करता येते.
  • तुती झाडांची लागवड एकदा केल्यानंतर जवळ जवळ 15 ते 20 वर्षे नविन तुती झाडांची लागवड करण्याची आवश्यकता भासत नाही.
  • कमीतकमी खर्चात अधिक पाला निर्मितीकरिता तुती झाडांची लागवड ही सुधारीत पट्टापध्दतीने करणे आवश्यक आहे.
  • सध्या महाराष्ट्रात 5 बाय 3 बाय 2 या पट्टा पध्दतीचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येत आहे.
  • तुती झाडांची लागवड ही प्रामुख्याने जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीमध्ये केली जाते.
  • तुती लागवड ही तुतीच्या कलमापासून तसेच तुती रोपाव्दारे सुध्दा करता येते.
  • तुतीची लागवड तुती कलमापासून करते वेळी तुती झाड हे कमीत कमी 5 मे 6 महिने वयाचे आसणे आवश्यक आहे.
  • तुती कलम हे पेन्सिल आकाराचे असावे. तुती कलमाची लांबी 6 ते 7 इंच इतकी व एका कलमावर कमीत कमी 3 ते 4 डोळे असणे आवश्यक आहे. तुती कलमाची लागवड करतेवेळी कलम हे 4 इंच जमिनित व 2 इंच जमिनिवर असावे. तुती कलमापासून तुती लागवड केल्यास कमीत कमी 5 ते 6 महिण्यात तुतीचे चांगले झाड तयार होते. म्हणजेच तुतीची बाग रेशीम अळी संगोपनास येते.
  • तुती लागवड केल्यानंतर प्रथम वर्षी शेतकऱ्यास एक-दोन पिके घेता येतात. दुसऱ्या वर्षीपासून शेतकऱ्यास वर्षातून 4 ते 5 पिके घेता येतात.
  • तुती लागवडीकरिता सध्या तुती झाडाच्या वेगवेगळ्या जाती उपलब्ध आहेत. जमिनीची प्रत पाहूनच तुती झाडाच्या जातीची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांकडे काळी कसदार जमीन आहे, तुती बागेकरिता भरपूर पाण्याची सोय आहे अशा शेतकरी बांधवानी व्ही-1 , एस-36 अशा सुधारीत तुती झाडांच्या जातीची निवड करावी. हलकी व कमी पाण्याची सोय असलेल्या शेतक-यांनी एम-5 या तुती जातीची निवड करावी.

रेशीम अळीचे संगोपन करुन रेशीम कोष निर्मिती करणे

  • रेशीम उद्योगातील महत्वाचा दुसरा भाग म्हणजे रेशीम अळीचे संगोपन करुन रेशीम कोष निर्मिती करणे हा होय.
  • रेशीम अळीचे जीवनचक्र हे अंडी, अळी , कोष व पतंग अशा अवस्था मधून (टप्प्यात ) एकूण 48 ते 52 दिवसात पूर्ण होते.
  • अंडी अवस्था 10 ते 12 दिवस, अळी 25 ते 26 दिवस , कोष अवस्था 10 ते 12 दिवस व पतंग अवस्था ही फक्त 3 ते 4 दिवसाची असते.
  • अळी अवस्थेमध्येच फक्त तुतीचा पाला अळ्यांना खाऊ घातला जातो. रेशीम अळीचे संगोपन करण्यासाठी रेशीम किटक संगोपनगृह बांधणे आवश्यक आहे.
  • एक एकर तुती लागवड असल्यास कमीतकमी 50 फूट लांब व 20 फूट रुंदीचे किटक संगोपनगृह (शेड) आवश्यक आहे. रेशीम अळीचे संगोपन हे मुख्यत्वे 22 ते 28 डिग्री सें.ग्रे. तपमान व 60 ते 85 % आर्द्रता या वातावरणामध्ये केले जाते. रेशीम अळी लहान असतेवेळी तुती झाडाची कोवळी पाने बारीक चिरुन खाऊ घातली जातात. अळी मोठी झालेवर तुती झाडांच्या फांदया कापून आणून अळयांना खाऊ घातल्या जातात. 25 ते 26 दिवस तुती पाला खाल्यानंतर अळी स्वत:भोवती रेशीम कोष तयार करते.
  • किटक संगोपन करतेवेळी किटक संगोपनगृहामध्ये स्वच्छतेला अत्यंत महत्व आहे. एक पिक घेतल्यानंतर शेड निरजंर्तुकीकरण करणे हे सुध्दा महत्वाचे आहे.
  • रेशीम कोषांचे जास्तीतजास्त उत्पादन घेण्याकरिता रेशीम अळींच्या वेगवेगळ्या जातींचा वापर केला जातो. सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये दुबार जातीच्या रेशीम धाग्याला खूपच चांगली मागणी आहे. यासाठी भारतात सध्या दुबार जातीच्या वेगवेगळ्या हायब्रीडचा वापर करणेत येत आहे.
  • बीड जिल्ह्यात सन 2012-13 मध्ये 96 % दुबार जातीच्या अंडीपुंजाचा वापर करुन रेशीम कोष निर्मिती करण्यात आली आहे.

कोष काढणे, रेशीम कोषापासून रेशीम धागा निर्मिती करणे

  • रेशीम उद्योगातील तिसरा टप्पा म्हणजे रेशीम अळीने कोष तयार केल्यानंतर कोष काढून घेणे व त्याची विक्री करणे हा होय.
  • अळीने कोष तयार केल्यानंतर 5 व्या किंवा 6 व्या दिवशी कोष काढून गोळा करावेत. कोषांची योग्य ती प्रतवारी करुन त्याची वेळेत विक्री होणे गरजेचे आहे. एक एकर तुती लागवडीपासून 4 ते 5 पिकामध्ये कमीतकमी 1.00 लक्ष रुपये पर्यंत उत्पादन शेतकऱ्यास मिळते.
  • शेतकरी यांनी उत्पादित केलेले रेशीम कोष शासन हमी दराने कोषांच्या प्रत नुसार खरेदी करतो. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला रेशीम कोष हा कुठेही विकण्यात शासनाने मुभा दिलेली आहे. त्यामुळे बरेच शेतकरी आपला माल खुल्या बाजारात विकतात. रेशीम कोषापासून मशीनव्दारे रेशीम धागा काढला जातो व त्यापासून रेशीमचे कापड तयार केले जाते.

रेशीम उद्योग योजना राबविण्यासाठी शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सोयी-सवलती

  • शेतकऱ्यास सी.डी.पी. अंतर्गत किटक संगोपनगृह उभारणीस 1 लाख रुपये, 1 लाख 50 हजार रुपये व 2 लाख रुपये तसेच एकूण प्रत्यक्ष खर्च विचारात घेऊन 50 हजार रुपये, 75 हजार रुपये आणि 1 लाख रुपये अनुदान दिले जाते.
  • शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृर्षी विकास योजने अंतर्गत प्रती एकरी 20 हजार रुपये अनुदान दिले जाते.
  • बागेतील ठिबक संच उभारणी एकरी खर्च 20 हजार रुपये गृहित धरुन 15 हजार रुपये अनुदान दिले जाते.
  • शासन 50 हजार रुपये किमतीच्या किटक संगोपन साहित्यासाठी शेतकऱ्यास 37 हजार 500 रुपये अनुदान दिले जाते.
  • शेतकऱ्यांस शासना मार्फत 75 % अनुदान देवून त्यांच्या मागणीनुसार अंडीपुजाचा पुरवठा केला जातो.
  • शासनामार्फत 750 रुपये विद्यावेतन देऊन शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाचे परिपूर्ण प्रशिक्षण देण्यात येते व तांत्रिक मार्गदर्शन विनामूल्य केले जाते.
  • रेशीम धागा निर्मिती युनिट उभारणी (शेड बांधणी व मशीनरी खरेदी) एकूण खर्च 10.00 लक्ष रुपये विचारात घेऊन यासाठी शासनाकडून 90 % अनुदान दिले जाते.
  • Door to Door Service Agent युनिट कॉस्ट.1.50 लक्ष रुपयांसाठी 100 % शासकीय अनुदान मिळते.
  • चॉकी किटक संगोपन युनिट कॉस्ट 3.45 लक्ष रुपयांसाठी 50 % शासकीय अनुदान मिळते. शेतकऱ्यास सीडीपी अंतर्गत तुती लागवड खर्चापोटी रक्कम रुपये 9 हजार रुपये प्रती एकर खर्च विचारात घेऊन रक्कम 6 हजार 750 रुपये अनुदान दिले जाते.

बीड जिल्हा अग्रेसर

  • मराठवाड्यातील हवामान व वातावरण देखील रेशीम शेती उद्योगाला पोषक असल्याने एकूण 7 जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योगामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन दिला जात आहे.
  • बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूरांचा स्थलांतराचा प्रश्न सोडविण्यास चांगल्या प्रकारे मदत झाल्याचे दिसून येत आहे.
  • बीड जिल्ह्यात 193 शेतकऱ्यांकडे 273 एकर क्षेत्रात तुतीची जुनी लागवड आहे. सन 2013-14 मध्ये देखील 1,51,195 अंडीपुंजाचे संगोपन करुन 82 मे. टन रेशीम कोषाचे उत्पादन झालेले आहे.
  • चालू वर्षी रेशीम कोषांना कर्नाटक राज्यात चांगला भाव मिळाल्यामुळे जवळ जवळ सर्व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला रेशीम कोष खुल्या मार्केटमध्ये विकला आहे.
  • विक्री केलेल्या कोषांची किंमत ही 2 कोटीच्या जवळ आहे.
  • मराठवाड्यातील शेतकरी मुख्यत्वे करुन ऊस, कापूस, मोसंबी, डाळींब, मिरची, इत्यादी नगदी पीके घेतात.त्यांच्या तुलनेत रेशीम उद्योगही अत्यंत फायदेशीर ठरत आहे.
  • मराठवाडयातील पीक पध्दतीचा विचार करता रेशीम शेती उद्योगाला नगदी पीक म्हणून फार मोठा वाव आहे.
  • रेशीम शेती उद्योग मराठवाडा व राज्यात वाढावा यासाठी राज्य शासन विविध योजना राबवून रेशीम संचालनालय, नागपूर यांच्यामार्फत प्रयत्न करीत आहे.
  • चालू वर्षी बीड जिल्ह्यात 300 एकरवर रेशीम शेती करण्याची उद्दिष्ट देण्यात आले असून 350 एकरवरील शेतीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. परंतु या वर्षी पाऊस उशीरा सुरु झाल्याने आजपर्यंत 71 शेतकऱ्यांनी 87 एकर शेतीवर तुतीची लागवड केली असून जिल्ह्यात इतरत्रही तुतीची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.
  • शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीबरोबरच रेशीम शेतीची जोड दिल्यास अळ्यांनी तुतीची पाने खाल्ल्यानंतर उरलेल्या देठे, काड्या आणि अळ्यांची विष्ठा हे जनावरांसाठी पोषक खाद्य असल्याने त्यावर गाय किंवा म्हैस पाळून दुग्धोत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये “ सिल्क व मिल्क इक्वल टू गोल्ड ” ही संकल्पना रुजण्यास सुरुवात झाली आहे आणि हाच शेतकऱ्यांच्या सोनेरी जीवनाचा मार्ग ठरत आहे.

राजेश लाबडे
जिल्हा माहिती कार्यालय, बीड
स्त्रोत: महान्युज
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment