फळांपासून बनवा सरबत, स्क्वॅश

फळांमध्ये मुबलक प्रमाणावर जीवनसत्त्वे व खनिजे असल्याने त्यांच्यापासून तयार केलेल्या पेयांना वर्षभर चांगली मागणी असते. फळांपासून तयार केलेली पेये ही कृत्रिम पेयांपेक्षा निश्‍चितच चांगली असतात.

सरबत

वेगवेगळ्या फळांपासून उत्तम प्रकारचे सरबत तयार करता येते. यासाठी दहा टक्के फळांचा रस, 15 टक्के साखर व 0.25 टक्का आम्लता ठेवून उत्तम प्रकारचे सरबत तयार करता येते.
स्क्वॅश ः स्क्वॅशचा वापर करून आपणास पाहिजे तेव्हा पेय तयार करता येते. यासाठी 25 टक्के फळांचा रस, 45 टक्के साखर व 0.8 टक्का आम्लता ठेवून स्क्वॅश तयार करता येतो. एक किलो रसापासून 3.333 किलो स्क्वॅश तयार होतो. वापरतेवेळी स्क्वॅशच्या एका भागात दोन किंवा तीन भाग थंड पाणी टाकून स्वाद घेतात. साठवून ठेवायचे असल्यास परीरक्षकाचा वापर करतात.

सिरप

यामध्ये साखरेचे व आम्लतेचे प्रमाण स्क्वॅशपेक्षा जास्त असते. यासाठी 25 टक्के फळांचा रस, 65 टक्के साखर व एक टक्का आम्लता ठेवून सिरप तयार करता येतो. कोकम, जांभूळ, फालसा, लिंबू, डाळिंब, काळ्या रंगाची द्राक्षे इत्यादी फळांपासून उत्तम प्रकारचा सिरप तयार करता येतो. वापरतेवेळी सिरपच्या एका भागात चार किंवा पाच भाग थंड पाणी टाकून त्यांचा आस्वाद घेतात. एक किलो रसापासून 2.5 लिटर सिरप तयार करता येतो.

फळांपासून जॅम / जेली / मार्मालेड


जॅम, जेली आणि मार्मालेड हे पदार्थ बहुतांश सारखेच असतात. हे पदार्थ चांगले होण्यासाठी साखर, पेक्‍टिन व आम्लता यांचे प्रमाण योग्य असणे जरुरीचे असते. साखरमिश्रित आटवलेल्या फळांच्या रसाला किंवा गराला जॅम असे म्हणतात. फळांचे बारीक तुकडे किंवा गर पाण्यात शिजवून त्यापासून काढलेला रस ठराविक वजनाच्या साखरेत शिजवून तयार केलेल्या पदार्थाला जेली असे म्हणतात. जेलीमध्ये एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण 65 डिग्री ब्रिक्‍सच्या वर असते. जेली पारदर्शक असावी व तिला फळांचा नैसर्गिक स्वाद असावा. जेली तयार करताना फळांतील पेक्‍टिनचे प्रमाण पाहणे फार महत्त्वाचे असते व त्यावरच वापरावयाच्या साखरेचे प्रमाण अवलंबून असते. मार्मालेड हासुद्धा एक जेलीचाच प्रकार आहे. त्यात फळांच्या गरांचे किंवा सालींचे तुकडे समाविष्ट केलेले असतात.

फळे सुकविणे

सर्वसाधारणपणे फळे सुकविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पूर्वतयारीमध्ये फळांची निवड, स्वच्छ धुणे, साली काढणे, योग्य आकारात त्यांचे तुकडे करणे किंवा चकत्या करणे वगैरेंचा समावेश होतो. फळे सुकविताना चांगली पिकलेली फळे निवडून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर त्यांची साल काढून तुकडे किंवा चकत्या कराव्यात. आवश्‍यकतेनुसार काही फळांना रसायनांची ठराविक काळ प्रक्रिया द्यावी, त्यानंतर फळे सुकवितात. घरगुती फळे आणि भाज्या वाळविण्यासाठी होम डायरचा उपयोग करतात.

फळांची कॅंडी

फळांपासून कॅंडी बनविताना फळांना थोडे नरम होईपर्यंत उकळतात किंवा वाफवतात. त्यानंतर साखरेच्या पाकाच्या वेगवेगळ्या तीव्रतेमध्ये या नरम झालेल्या फळांच्या फोडी ठराविक काळासाठी बुडवितात. त्यासाठी 40, 50, 60, 70 डिग्री ब्रिक्‍सचा पाक बनवितात. या तीव्रतेच्या पाकात काही कालावधीसाठी अशा फोडी बुडवितात. त्यानंतर साखरेचा पाक वेगळा करून या फोडी वाळवणी यंत्रात अथवा सूर्यप्रकाशात अथवा सावलीमध्ये वाळवितात, तसेच काही फळे हवाबंद किंवा बाटलीबंद करून टिकवितात, तर काही फळे लोणच्याच्या किंवा चटणीच्या स्वरूपातही टिकवितात.
----------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment