ज्वारीपासून पापड, बिस्किटे

भाकरीतील प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय घटक (रेझिस्टंट स्टार्च), शर्करा आणि खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीच्या दाण्यातील गुणप्रत अनेक भौतिक, रासायनिक व प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या बाबीवरती अवलंबून असते. आपल्याकडे प्रामुख्याने ज्वारीचा उपयोग ज्वारीची भाकरी म्हणूनच मोठ्या प्रमाणात करतात. तसेच काही वाणांचा उपयोग लाह्या, हुरडा, पापड, बिस्किटे अशा खाद्य पदार्थांसाठी होऊ शकतो.
ज्वारीचे विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी प्रथम त्याचे बारीक पिठामध्ये रूपांतर केले जाते. ज्वारीच्या दाण्यामध्ये लायसीन हे अमिनो आम्ल अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे ज्वारीच्या प्रथिनांची प्रत कमी दर्जाची समजली जाते, तसेच पिठास खरबरीतपणा अधिक (कोर्स) असल्यामुळे लोकांची पसंती कमी असते. या अडचणीवर मात करण्यासाठी, उपलब्ध ज्वारीची उपयोगिता किंवा मूल्यवर्धन वाढविण्यासाठी ज्वारीच्या पिठात ज्वारीचेच माल्ट किंवा आंबविलेले पीठ वापरणे फायद्याचे ठरते.
ज्वारीमध्ये लायसीन आणि मिथिओनाईन ही अत्यावश्‍यक अमिनो आम्ले तसेच ज्वारीच्या पिठाची पौष्टिक मूल्ये ज्वारीला मोड आणून किंवा त्याच्या पिठाचे आंबविणे करून (फर्मिनटेशन) वाढविता येतात. ज्वारी दाणे दहा तास पाण्यात भिजवून नंतर 24 तास मोड येण्यास ठेवले असता चांगले माल्टिंग होते.

ज्वारीच्या पिठामध्ये सोयाबीनचे माल्टयुक्त पीठ, नाचणीचे माल्टयुक्त पीठ मिसळून त्यापासून पदार्थ बनविल्यास मानवी शरीरास आवश्‍यक असणारी सर्व अमिनो आम्ले आणि इतर घटक पदार्थ विपुल प्रमाणात उपलब्ध होतात. मूल्यवर्धन करून तयार केलेले ज्वारीचे पीठ चांगल्या प्रकारे व्हॅक्‍यूम पॅक केले असता त्याची साठवणक्षमता सहा महिन्यांपर्यंत अत्यंत चांगली राहते. अशा पिठापासून आपणास केव्हाही भाकरी, पराठे, थालीपीठ, वडे किंवा इतर पदार्थ तयार करता येतात. अशा प्रकारच्या पिठापासून बनविलेल्या पदार्थांपासून त्वरित ऊर्जा, प्रथिने व इतर जीवनसत्त्वे उपलब्ध होऊन पचनक्रियेस वेळ न लागता शरीरास लवकर उपलब्ध होतात.

हुरडा

रब्बी हंगामात थंडीच्या मोसमात ज्वारीचे दाणे हिरवट, परंतु दुधाळ अवस्थेच्या पुढे जाऊन पक्व होण्याच्या अगोदरच्या अवस्थेत (सॉफ्ट डफ) असतात, त्या वेळेला भाजलेल्या (होरपळलेल्या) अवस्थेत अतिशय चवदार, मऊ व गोडसर लागतात, त्यास ज्वारीचा हुरडा असे म्हणतात. हिरव्या दाण्यांचा हुरडा अतिशय चांगला लागतो, कारण त्या वेळेला त्या दाण्यांमध्ये मुक्त अमिनो आम्ले, साखर, विद्राव्य प्रथिने, जीवनसत्त्वे यांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे असे दाणे गोवऱ्यांच्या उष्णतेवरती भाजले असता दाण्यांतील विविध रासायनिक घटकांची विशिष्ट रासायनिक प्रक्रिया होऊन "कॅरमलायझेशन'मुळे दाण्यांस एक प्रकारची स्वादिष्ट चव प्राप्त होते.
हुरड्यामध्ये लिंबू, मीठ, साखर, तिखट, मसाला यांसारखे पदार्थ वापरून त्याची चव द्विगुणित करता येते. खास हुरड्यासाठी गोडसर, रसाळ आणि भरपूर दाणे असणाऱ्या फुले उत्तरा या वाणाची शिफारस संशोधन केंद्रामार्फत करण्यात आलेली आहे. सध्या ज्वारीच्या हुरड्याची लोकप्रियता वाढत चाललेली आहे.

लाह्या

ज्वारीपासून लाह्या बनविण्यासाठी प्रामुख्याने त्या ज्वारीच्या दाण्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असणे गरजेचे आहे. कारण अशा प्रकारचे दाणे अति उच्च तापमानात एकदम गरम केले असता दाण्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते दाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे दाण्यातील स्टार्च फुलला जाऊन त्याचा बस्ट होतो व पुढे त्याची लाही तयार होते.
जेवढ्या प्रमाणात स्टार्च दाण्यामध्ये अधिक असेल, त्या प्रमाणात लाहीचे आकारमान होते. त्यासाठी उच्च तापमानाची आवश्‍यकता असते. लाह्यांसाठी वॅक्‌सी ज्वारीच्या वाणाची निवड करावी, कारण त्यापासून मोठ्या आकारमानाच्या पांढऱ्या शुभ्र लाह्या मिळतात. ज्वारीच्या लाह्या सध्या "लोकॅलरी हाय फायबर स्नॅक फूड' म्हणून लोकप्रिय आहेत. या लाह्या अधिक चवदार होण्यासाठी विविध मसाल्यांचे पदार्थ वापरून चविष्ट लाह्या तयार करणे, तसेच या लाह्या अधिक काळ चांगल्या कुरकुरीत चवदार राहण्यासाठी व्हॅक्‍यूम पॅकेजिंग तंत्राचा वापर करण्याचे प्रयोग चालू आहेत. काही भागामध्ये ज्वारीच्या लाह्यांचे पीठ करून ते ताकाबरोबर खाण्याची प्रथा आहे. मक्‍याच्या लाह्यांप्रमाणेच ज्वारीच्या लाह्या करून वर्षभर विकण्याचा व्यवसाय करणे शक्‍य होऊ शकते

पापड, भातवडी

ज्वारीमधील आहारमूल्यांचा उपयोग मानवी शरीरास होण्यासाठी ज्वारीचे उत्कृष्ट पौष्टिक पापड किंवा भातवडी बाजारात आणणे गरजेचे आहे. ज्वारीच्या माल्टयुक्त पिठापासून, तसेच नाचणीच्या, सोयाबीनच्या माल्टयुक्त पिठापासून पापड किंवा भातवडी तयार केली असता त्यापासून भरपूर प्रमाणात आहारमूल्ये मिळू शकतात. खेडेगावात ज्वारीचे दाणे आंबवून त्यापासून चीक तयार करून त्यामध्ये आवश्‍यकतेनुसार मीठ टाकून शिजवतात आणि नंतर पातळ कापडावर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर पातळ थर देऊन पापडाच्या आकाराच्या भातवड्या तयार केल्या जातात. या भातवड्या भाजून किंवा तेलात तळून स्नॅक फूड म्हणून वापरल्या जातात. याप्रमाणेच ज्वारीचे पापड तयार करताना पापडखार आणि इतर मसाल्याचे पदार्थ वापरून लहान-मोठ्या आकाराचे पापड तयार करतात. हाय फायबर, लो कॅलरीज, हाय प्रोटिनयुक्त माल्टच्या पापडांचा किंवा भातवड्यांचा आरोग्याच्या दृष्टीने निश्‍चितच चांगला फायदा होऊन त्यास चांगली मागणी मिळू शकेल.

बिस्कीट आणि कुकीज


बिस्कीट आणि कुकीजची निर्मिती प्रामुख्याने गव्हाच्या मैद्यापासून केली जाते; परंतु काही प्रयोगाअंती असे दिसून आले आहे, की मैद्यामध्ये साधारणतः 20 टक्‍क्‍यांपर्यंत आपण ज्वारीचे पीठ वापरून बिस्किटे व कुकीज चांगल्या प्रतीची करू शकतो. मधुमेह पेशंटसाठी हाय फायबर, लो कॅलरीज बिस्कीट किंवा कुकीज बनविण्यासाठी साखरविरहित, क्रीमविरहित, प्रथिनयुक्त असे घटक पदार्थ वापरता येतील, तसेच त्याची पौष्टिक मूल्ये वाढविण्यासाठी नाचणी, सोयाबीन, ज्वारीच्या माल्ट पिठाचा वापर करता येईल. अशा प्रकारच्या बिस्किटांची निर्मिती करून ज्वारीचे मूल्यवर्धित पदार्थांत रूपांतर करता येईल.
ः डॉ. उत्तम चव्हाण, 02426- 243253
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment