लिंबूवर्गीय फळपिकांवर प्रक्रिया-१

महाराष्ट्रातील हवामान लिंबूवर्गीय फळ झाडाच्या लागवडीस पोषक असल्यामुळे संत्रा, मोसंबी व कागदी लिंबूच्या लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. लिंबूवर्गीय फळ झाडाच्या लागवडीत भारतात महाराष्ट्राचा एकूण फळे उत्पादनात या फळांचा फार मोठा वाटा आहे. व्यापारीदृष्ट्या महत्व असलेल्या लिंबूवर्गीय फळझाडात लिंबू, संत्रा व मोसंबी याचा समावेश होतो.

शरीराचे योग्य पोषण होऊन माणसाला सुस्थितीत आणि रोगमुक्त जीवन जगायचे असेल तर दैनंदिन आहारात केवळ तृणधान्ये, कडधान्ये या पिष्टमय, स्निग्धांश किंवा प्रथिनयुक्त अन्न पदार्थांचा अंतर्भाव करुन भागणार नाही, तर आपल्या आहारात खनिजे आणि जीवनसत्वे यांचासुद्धा समावेश असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मानवी आरोग्याचे संरक्षक आणि संवर्धक आहेत. कारण फळे आणि भाजीपाला याचा आहारात नियमित समावेश झाल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. खनिजांच्या अभावामुळे ज्वलनप्रक्रिया मंदावते. फळातून जे पेक्टीन आणि सेल्यूलोज मिळते त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

लिंबूवर्गीय फळात काढणी पश्चात नासाडी, नुकसानीचे प्रमाण संत्र्यात 20-40 टक्के तर लिंबू व मोसंबीत 10-25 टक्के आहे. फळाची काढणी पश्चात अयोग्य हाताळणी, योग्य साठवण पद्धतीचा अभाव, वाहतुकीत होणारा विलंब, योग्य वितरण व विक्री व्यवस्थेचा अभाव तसेच प्रक्रियामुक्त पदार्थाची नगण्य निर्मिती यामुळे लिंबूवर्गीय फळाचे काढणी पश्चात मोठे नुकसान होते. दरवर्षी होणाऱ्या फळांच्या नासाडीमुळे आपल्या देशाचे आर्थिक नुकसान होते. नासाडीचे महत्वाचे कारण म्हणजे काढणीनंतर फळे चुकीच्या पद्धतीने हाताळली जातात. याशिवाय अयोग्य पद्धतीने काढणी, अयोग्य हाताळणी, पॅकिंगचा अभाव, वाहतुकीला होणारा विलंब चुकीच्या पद्धतीने केली जाणारी साठवण किंवा योग्य साठवणीच्या सोयीचा अभाव आणि योग्य वितरण व्यवस्थेअभावी फळांची नासाडी अधिकच होते.

लिंबूवर्गीय फळे नासाडीचे कारण म्हणजे भौतिक बदल, चिरडणे, फुटणे, खरचटणे, दबणे, जैविक आणि रासायनिक बदल इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. फळांची शात्रोक्त पद्धतीने काढणी, शेतावरील हाताळणी, प्रतवारी, पॅकिंग, साठवणी, वाहतूक प्रक्रिया व निर्यात इत्यादी होणारी नासाडी आपल्याला कमी करता येणे सहज शक्य आहे.

लिंबूवर्गीय फळांच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटक

फळांचे नाव पाणी कार्बोहायड्रेट्स प्रथिने तंतूमय पदार्थ खनिजे अ जीवनसत्व (आय. यु.) क जीवनसत्व (मि. ग्रॅम)
मोसंबी 88.2 8.2 0.6 1.5 0.8 240 50
संत्री 86.2 11.6 0.9 0.4 0.6 200 53
लिंबू 88.4 9.3 0.8 0.5 0.7 210 47

लिंबूवर्गीय फळांची काढणी- फळाच्या काढणीसाठी आवश्यक बाबी

फळ काढणी काळ (दिवस) टी. एस. एस (विद्राव्य घटक) (बिक्स) रसाचे प्रमाणे
(टक्के)
रंग घट्टपणा आम्लता (टक्के)
संत्रा 225 ते 250 10 पेक्षा कमी नसावा 38 ते 40 1/3 भागावर फिकट नारंगी पिवळा घट्ट असलेली साल थोडी सैल होते व सालीवर चकाळी तेलकट ग्रंथी टिपके स्पष्ट दिसू लागतात.
मोसंबी 240 ते 270 12 पेक्षा कमी नसावा 40 ते 45 हिरवा रंग जाऊन फळास फिकट हिरवा किंवा फळे पिवळसर दिसू लागात फळे मऊ होतात व फळे बोटाने दाबले जाते. 0.3 ते 0.5
लिंबू 150 ते 170 8 पेक्षा कमी नसावा 45 ते 47 गडद हिरवा रंग फिकट होऊन पिवळसर दिसू लागतात फळे मऊ होतात. 61 ते 65

फळांची स्वच्छता व प्रतवारी

काढणीनंतर किडलेली, नासलेली, दबलेली, फुटलेली, खरचटलेली, तडा गेलेली फळे बाजूला करावी. त्यानंतर त्यांचे वजन व आकारानुसार प्रतवारी करावी. प्रथम दर्जाची, आकर्षक- टवटवीत, मोठ्या आकाराची आणि ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन अशी फळे मोठ्या आणि दुरवरच्या बाजारपेठांसाठी पाठवावी.

फळाची काढणी करुन ती शेतावर सावलीत जमा केल्यानंतर बागेत किंवा शेतावरील शेडमध्ये साळीचे तनिस पसरुन घ्यावे, त्यावर काढणी केलेली फळे पसरावीत व 24 तास तशीच ठेवावीत. यामुळे फळातील गर्मी कमी होऊन फळात चाललेल्या मेटॉबोलीक क्रिया स्थिरावतील. यानंतर फळे क्लोरीनच्या पाण्याने व नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. अशाप्रकारे धुतलेली फळे बुरशीनाशक द्रावणात 5 मिनिटे बुडवून ठेवावीत. या स्वच्छता प्रक्रियेमुळे पेनीसिलीय व अस्परजिलस या बुरशीमुळे होणारे रोग किमान 3 ते 4 आठवड्यापर्यंत नियंत्रणात राहतात. तसेच फळे धुतल्याने त्याचा मुळ रंग व चकाकी व ताजेपणा कायम राहण्यास मदत होते.

काढणी पश्चात व्यवस्थापन प्रक्रिया

फळांची काढणी करणे, करंड्या किंवा टोपलीत ठेवून पॅकिंग शेडमध्ये वाहतूक करणे, डिग्रीनिंगची प्रक्रिया करणे, फळांना हलकासा ब्रश फिरवून फळे पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत सुकविणे फळांना 2,4 डी व मेणाच्या द्रावणात बुडविणे, फळांच्या रंगावरुन मशिनद्वारे प्रतवारी करणे, फळांची 12.8 ते 14.4 अंश सेल्सिअस तापमानाला 1 ते 5 महिन्यापर्यंत साठवण करणे, खराब फळे बाजूला करणे, पुन्हा साबणाच्या बुरशीनाशकाच्या द्रावणात फळे धुवून त्यांच्यावरुन हलकासा ब्रश फिरविणे, प्रतवारी करणे, फळे खोक्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्यात पॅक व वाहतूक करणे.

साठवण

फळांचे आयुष्य वाढविणे म्हणजे पर्यायाने ग्राहकाला अधिक काळापर्यंत फळे उपलब्ध करुन देणे हा साठवणुकीचा मुख्य उद्देश असतो. उत्पादनानंतर प्रचंड प्रमाणावर फळे केवळ साठवणीच्या सोयीअभावी नाश पावतात. काढणीनंतर फळे अंतर्गत जैविक आणि रासायनिक क्रिया अखंडपणे चालू असतात. यामध्ये बाष्पीभवनाची क्रिया, श्वसनाची क्रिया व पिकण्याची क्रिया याचा अंतर्भाव होतो. या सर्व क्रिया वातावरणाच्या तापमानाशी संबंधीत असतात. म्हणून त्यांची साठवण कमी तापमानाला आणि योग्य त्या आर्द्रतेला केल्यास वर सांगितलेल्या क्रियांचा वेग मंदावतो.
दुसरी बाब म्हणजे कमी तापमानाला सूक्ष्म जंतूंचा प्रादुर्भाव कमी असतो. लिंबूवर्गीय फळे योग्य पद्धतीने साठवण केल्यास त्याचे आयुष्य दुपटी-तिपटीने वाढते.

लेखक - प्रा. तुषार गोरे (अन्नशास्त्र तंत्रज्ञान)
डॉ. हेमंत बाहेती, कार्यक्रम समन्वयक,
कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद, जळगाव.
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment