प्रौढ रेशीम कीटक संगोपनासाठी फांदी पद्धत फायद्याची...Benefit of adult silk pest ropeway method ...

रेशीम कीटकांना फांदीसह पाला दिला जात असल्याने, पाने सुकण्याचा वेग कमी होतो. बेडवरील कीटकांना तुती पाला खाण्यासाठी जास्त वेळ उपलब्ध होतो. कीटक निरोगी राहण्यास मदत होऊन कोषोत्पादन वाढण्यास मदत होते. 
प्रौढावस्थेतील रेशीम कीटकांना एकूण संगोपनाच्या जवळपास 94 टक्के तुती पाला लागतो. या अवस्थेतील कीटकांची निरोगी वाढ होण्यासाठी योग्य प्रतिच्या व योग्य प्रमाणात तुती खाद्याची आवश्‍यकता असते.
1) चॉकी कीटकांच्या तुलनेत प्रौढावस्थेतील कीटकांना जास्तीत जास्त प्रथिनयुक्त पानांची आवश्‍यकता असते. त्याचबरोबर तुती पाल्यातील ओलाव्याचे प्रमाण (70-73 टक्के)कमी असावे लागते. यासाठी 55 ते 65 दिवसांच्या वयाच्या तुती फांद्या योग्य ठरतात. या वयाच्या तुती फांदीवरील 75 ते 80 टक्के पाला जून आणि 20 ते 25 टक्के पाला कोवळा असतो.
2) आपण फांदी फिडिंग पद्धत वापरत असल्याने फिडिंगच्या वेळी तुती फांदी बेडवर एका आड एक उलट-सुलट दिशेने देत असल्याने बेडवरील सर्व कीटकांना समान प्रतिचा (कोवळा आणि जून) पाला खाण्यास उपलब्ध होतो. परिणामी रेशीम कीटक एकाच वेळी कातीवर बसणे-उठणे, एकाच वेळी कोष बांधण्यासाठी परिपक्व होणे, इ. क्रिया वेळेत होतात.
3) प्रौढावस्थेतील रेशीम कीटकांचे फांदी पद्धतीने संगोपन केले जात असल्याने तुती बागेतून सकाळी आणि संध्याकाळच्या थंड वेळेतच पाच फूट उंचीच्या तुती फांद्या बुड्यातून कापाव्यात. 20 ते 25 किलो वजनाचे फांद्यांचे बंडल बांधून वाहतूक करावी.
4) तुती बाग ते कीटकसंगोपनगृह यातील अंतर अर्ध्या तासापेक्षा जास्त असल्यास फांद्यांचे बंडल ओल्या गोणपाटाने गुंडाळून वाहतूक करावी. यामुळे पाला सुकणार नाही, गुणवत्ता टिकून राहील.
5) कापून आणलेल्या तुती फांद्यांची साठवणूक कमी तापमान, जास्त आर्द्रता, निरोगी व स्वच्छ खोलीत करावी. पाला साठवण्याच्या खोलीत जास्त प्रमाणात हवा खेळती असणार नाही याची दक्षता घ्यावी; अन्यथा पाला सुकण्याची शक्‍यता असते.
6) पाला साठवणूक करतेवेळी तुती फांद्यांचे बंडल उभे ठेवून ओल्या गोणपाटाने झाकावेत.
7) सुकलेली, पिवळी, धूळयुक्त, रोगीष्ट, शिळी तुती पाने रेशीम कीटकांना खाऊ घालू नये.

फांदी पद्धतीचे फायदे

1) फांदी पद्धतीला "शूट रिअरिंग' असे म्हणतात. यामध्ये तुती पाने न तोडता संपूर्ण तुती फांदी कीटकांना खाद्य म्हणून दिली जाते. ही पद्धत रेशीम शेती उद्योगात प्रगत समजल्या जाणाऱ्या चीन, जपान, रशिया, ब्राझील इ. राष्ट्रांमध्ये वर्षभर वापरली जाते. आपल्या राज्यातील रेशीम शेतकरी या पद्धतीने रेशीम कीटकसंगोपन करीत आहेत. त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यास अधिकाधिक उत्पन्न मिळत आहे.
2) संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की, या पद्धतीचा वापर केल्याने चौथ्या अवस्थेचा कालावधी 7.95 टक्‍यांनी कमी होतो.
3) रेशीम कीटकांना खाद्य देण्याच्या वेळेत 60 टक्‍क्‍यांनी बचत होते, कीटकसंगोपन साहित्याच्या खर्चात 12.4 टक्‍क्‍यांनी बचत होते. तुती बागेची छाटणी, पाला तोडणे, पाला खाद्य देणे इ. कामांमध्ये 60 टक्‍क्‍यांनी मजूर कमी लागतात.
4) या पद्धतीत संपूर्ण तुती फांदीचा वापर होत असल्याने 15ते 20 टक्के तुती पाला खाद्यामध्ये बचत होऊन एकरी 15ते 20 टक्के जास्त अंडीपुंजांचे संगोपन होते.
5) फांदीसह पाला दिला जात असल्याने, पाने फांदीलाच असतात त्यामुळे पाने सुकण्याचा वेग कमी होतो परिणामी बेडवरील कीटकांना तुती पाला खाण्यासाठी जास्त वेळ उपलब्ध होतो. त्यामुळे कीटकांची भूक भागण्यास मदत होते.
6) कीटकांना कमी प्रमाणात हाताळले जात असल्याने तसेच कीटक विष्ठेच्या सान्निध्यात येत नसल्याने कीटक निरोगी राहण्यास मदत होऊन कोषोत्पादन वाढण्यास मदत होते.
7) कोषोत्पादनाच्या खर्चात बचत झाल्याने एकरी 40ते 50 टक्के नफ्यात वाढ होते.
8) कीटकशय्येवर कीटकांना त्रिमितीय जागा उपलब्ध होत असल्याने बेडमध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते. त्यामुळे बेड, कीटकांची विष्ठा सुकण्यास मदत होते.
9) फांदी पद्धतीचा अवलंब केल्याने तुती बागेतील आंतरमशागतीची कामे सहजासहजी करता येतात.

फांदी पद्धतीचे काही तोटे

1) या पद्धतीने कीटकसंगोपन करण्यासाठी जास्त जागा लागते.
2) या पद्धतीच्या वापरामुळे नव्याने लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना अपेक्षित वयाचे तुती बेणे उपलब्ध होत नाही.

संपर्क - संयज फुले 9823048440
(लेखक जिल्हा रेशीम कार्यालय, पुणे येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment