दुग्धजन्य पदार्थांची जपा गुणवत्ता | Preserve Quality of milk products | sheti purak vyavsay

दुग्धजन्य पदार्थांचे पॅकेजिंग ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी बाजारपेठेत विविध पॅकेजिंगचे घटक उपलब्ध आहेत. पशुपालकांची बाजारपेठेची मागणी पाहून खवानिर्मिती उद्योगाकडेही लक्ष द्यावे. यासाठी विविध क्षमतेची यंत्रे उपलब्ध आहेत.

पॅकेजिंग

उत्तम पॅकेजिंगचा वापर करून पदार्थ आहे त्या परिस्थितीत जास्तीत जास्त टिकविण्यास मदत होते. पदार्थ ग्राहकांपर्यंत व्यवस्थित पोचवण्यासाठी पॅकेजिंग हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
1. पॅकेजिंगसाठी ग्रीस प्रूफ पेपर, बटर पेपर, प्लॅस्टिक कोटेड पेपर, पेपर बोर्ड इत्यादी कागद आणि त्यापासून तयार केलेल्या पॅकेजिंगचा समावेश होतो.
2. पॅकेजिंगसाठी काचेचा देखील उपयोग होतो; परंतु यात प्रकाशामुळे पदार्थ लवकर खराब होतो. सुगंधी दुधासाठी कमी वजनाच्या काचेच्या बाटल्या बाजारात उपलब्ध आहेत.
3. प्लॅस्टिकमध्ये अनेक प्रकारचे प्लॅस्टिक पॅकेजिंग उपलब्ध आहेत. प्लॅस्टिक वेगळ्या कागदांबरोबर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक एकत्र करून लॅमिनेट तयार करतात.
4. दुधाचे वितरण करण्यासाठी दूध पिशवी/ बाटलीत भरण्यात येते. सदर सयंत्राद्वारे आवश्‍यक त्या परिमाणाचे दूध (200/500/1000मिली लिटर) पॉलिथिलीन फिल्म किंवा बाटलीत भरण्यात येते.
5. या सयंत्राद्वारे आवश्‍यक त्या क्षमतेची पॉलिफिल्मची पिशवी बनविणे, ती भरणे व सीलिंग करणे या क्रिया स्वयंचलित पद्धतीने केल्या जातात.

खवानिर्मिती यंत्र

1. खवानिर्मिती यंत्र गॅसवर चालणारे, डिझेलवर चालणारे आणि वाफेवर चालणारे, असे तीन प्रकारात उपलब्ध आहे.
2. बहुतांशी गॅसवर चालणाऱ्या यंत्राचा जास्त वापर होतो. प्रति किलो खवा उत्पादनाच्या खर्चात मात्र, यंत्रानुसार खर्च वेगवेगळा येतो.
3. खवानिर्मिती यंत्रामध्ये मोठे गोलाकार भांडे असते. क्षमतेनुसार मोटारच्या साह्याने भांडे गोल फिरते.
4. भांड्यात असणाऱ्या दोन स्क्रॅपरच्या साह्याने दूध भांड्याच्या पृष्ठभागास म्हणजे तळाला आणि कडेस (दीड ते दोन वीत) लागत नाही. फक्त आपल्याला आचेवर नियंत्रण ठेवावे लागते.
5. बासुंदी तयार करण्यासाठी आइस्क्रीम मिक्‍स गरम करण्यासाठी, कुल्फीचे दूध आटविण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो.

निर्जलीकरण व भुकटी करण्याची यंत्रसामग्री

1. निर्जलीकरण म्हणजे दूध आटविणे. ज्या ठिकाणी हवेचा दाब कमी आहे, अशा ठिकाणी द्रव पदार्थाचा उकळबिंदू कमी असतो. या तत्त्वावर दूध तापत असलेल्या बंद भांड्यामधील हवा काढल्यामुळे कमी तापमानात दुधातील पाण्याची वाफ केली जाऊन दूध आटविण्याची क्रिया पार पडते.
2. या भांड्यातील दुधाचे तापमान 54.8 ते 60 अंश सेल्सिअस इतके ठेवतात व त्यातील हवा निर्वात पंपाच्या साह्याने काढतात.
3. निर्वात अवस्था मोजण्याच्या यंत्रामध्ये भांड्यातील निरपेक्ष दाब 60 सें. मी. पाऱ्याच्या स्तंभाएवढा राहील. (सामान्य हवेचा दाब 76 सें.मी. असतो.) एवढी हवा बाहेर काढतात.
4. दुधातील वाफ काढण्याच्या या क्रियेद्वारे 3 - 1 किंवा 2 - 1 इतके दुधाने घनफळ कमी करतात.
5. या यंत्राच्या साह्याने दूध किंवा स्निग्धांशरहित दूध भुकटीच्या स्वरूपात तयार केले जाते.
6. दुधाची भुकटी करण्याची यंत्रसामग्री दोन प्रकारची आहे. पहिल्या प्रकारास तुषार शुष्कन म्हणतात.
7. विशिष्ट तापमान असलेल्या शंकूच्या आकाराच्या अगंज पोलादाच्या हौदात अथवा पेटीच्या आकाराच्या भांड्यात दूध पंपाच्या साह्याने लहान छिद्र असलेल्या नळीवाटे फवारले जाते.
8. भांड्यातील उष्णतेमुळे क्षणार्धात तुषारातील पाण्याची वाफ होऊन दूध कणाच्या स्वरूपात (भुकटी) तळाशी पडते.
9. दुसऱ्या प्रकाराला रूळ शुष्कन पद्धत म्हणतात. जेमतेम फिरत राहतील इतके थोडे अंतर ठेवून अगंज पोलादाचे दोन रूळ विशिष्ट तापमानापर्यंत गरम ठेवून दोन रुळांच्या मध्यभागी दूध ओतले जाते.
10. रुळांवर दुधाचा पातळसा पापुद्रा तयार होत असतानाच त्यातील पाण्याची वाफ होऊन राहिलेल्या भागाचे घन स्वरूपात रूपांतर होते.
11. रुळालगत असलेल्या खर्ड्यामुळे (खरडणाऱ्या साधनामुळे) ही भुकटी खरडली जाऊन खाली पडते.
12. तुषार शुष्कन पद्धतीने तयार केलेल्या मलईरहीत दुधाच्या भुकटीचा उपयोग करते वेळी ती झटपट विरघळली जावी यासाठी ही भुकटी दुसऱ्यांदा शुष्क करतात.
13. हे ज्या यंत्रसामग्रीच्या साह्याने करतात त्याला "तत्क्षणिक शुष्कक' म्हणतात.
14. या यंत्रणेमध्ये गरम हवेच्या झोताच्या साह्याने दुधाची भुकटी पुन्हा कोरडी करण्याआधी वाफेच्या साह्याने ओली करतात.
15. याचा उद्देश कणांच्या बारीक गुठळ्या तयार व्हाव्यात हा आहे. पुढे या गुठळ्यांवरून गरम हवेचा झोत वाहून नेऊन त्या कोरड्या केल्या जातात व चाळणीने चाळल्या जाऊन तयार झालेली भुकटी विरघळली जाते.

1. दूध काढण्यापासून ते दुग्धप्रक्रियालयात होणाऱ्या विविध प्रक्रिया, ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी भरण्यात येणाऱ्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, पुठ्ठ्याची खोकी यामध्ये दूध भरण्याच्या सर्व क्रिया अलीकडे यंत्राच्या साह्याने करण्यात येतात.
2. दुधामध्ये स्निग्धांश, प्रथिने, मेद, जीवनसत्त्वे आणि पाणी यांचे प्रमाण मुबलक असल्याने सूक्ष्मजीवांची वाढ दुधात लगेच होते.
3. पर्यायाने दूध लवकर नासते किंवा खराब होते. त्यासाठी दुधावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया विविध यंत्राद्वारे केली जाते.

संपर्क - डॉ. ए. एम. चप्पलवार : 9420788302
( लेखिका पशुजन्य पदार्थ प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी येथे कार्यरत आहेत.)
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment