पॅकेजिंग घटकांची करा योग्य निवड | The right choice for packaging components | sheti purak vyavsay

शेतमालाचे आपण दर्जेदार उत्पादन घेतो. परंतु त्याची गुणवत्ता टिकविण्यासाठी तसेच बाजारपेठेत त्याची मागणी वाढविण्यासाठी आपण म्हणावे तेवढे लक्ष देत नाही. बदलत्या बाजारपेठेप्रमाणे आपणही बदलले पाहिजे.
देशातील शेती क्षेत्राचा अभ्यास करता आपल्यापुढे प्रामुख्याने धान्योत्पादन, फळपिके, फुलशेती, दुग्धजन्य पदार्थ, मसाला पिके, कुक्कुटपालन हे आपल्या डोळ्यांसमोर येते. अजुनही आपल्याकडील बाजारपेठेत धान्य, भाजीपाला, फळे थेट ग्राहकांच्यापर्यंत विकली जातात. दुधाच्या बरोबरीने दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच दही, तूप, पनीर, कॉटेज चीज तसेच मिठाई आपण दुकानातून विकत घेतो. याच बरोबरीने बाजारपेठेत आपल्याला सुकामेवा, वाळविलेला भाजीपाला, जाम, जेली, सुकविलेले फळांचे काप, भाजीपाला, वनौषधी पावडर वनौषधी अर्क, मसाल्याचे अर्क, विविध प्रकारची लोणची, "रेडी टू इट' अन्नपदार्थ आपल्याला मिळू लागले आहेत.
फुलांची बाजारपेठ पहाता ताजी फुले थेट ग्राहकांना विकली जातात. शहरी बाजारपेठेत सुकविलेली फुले तसेच फुलांचा अर्क, तेल यालाही चांगली मागणी आहे. मसाल्याच्या बाजारपेठेत वाळविलेले मसाले, पावडर याचबरोबरीने आले, लसूण पेस्टदेखील विक्रीस उपलब्ध झाली आहे. बदलत्या शहरी आणि ग्रामीण लोकजीवनाप्रमाणे अशा वेगवेगळ्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. ही नावीन्यपूर्ण उत्पादने टिकविण्यासाठी आणि ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी या उत्पादनांचे पॅकिंग ही महत्त्वाची गोष्ट आहे.

हवे योग्य पॅकिंग

  1. पदार्थाचे स्वरूप, वाहतुकीचा प्रकार आणि टिकवणक्षमतेनुसार पॅकिंग घटकांचा वापर करावा लागतो.
  2. पॅकिंग केलेला शेतमाल किंवा पदार्थ कोणत्या प्रकारच्या गोदामाममध्ये किंवा शीतगृहामध्ये साठविणार आहोत, यानुसार देखील पॅकेजिंगमध्ये बदल होतात.
  3. वाहतुकीमध्ये काही वेळा पुन्हा वापरात येऊ शकेल अशा पद्धतीच्या पॅकेजिंग घटकांचा वापर केला जातो.
  4. पदार्थांचे स्वरूप लक्षात घेऊन पॅकेजिंगमधूनही वायूविजय योग्य प्रकारे होईल अशा पद्धतीचे घटक वापरले जातात. शक्‍यतो पर्यावरणाला कमी धोका राहील या पद्धतीने पॅकेजिंगचे घटक वापरणे आवश्‍यक असते.

पॅकेजिंगचे घटक

1) पेपर 2) प्लॅस्टिक 3) तागाच्या धाग्यांचा वापर 4) कापूस धाग्यांचा वापर 5) लोखंडी बॉक्‍स 6) काचेच्या बाटल्या 7) प्लॅस्टिक बॉक्‍स कंटेनर 8) लाकडी कंटेनर 9) मोठ्या आकाराचा पिशव्या 10) विणलेली पोती 11) फोम जाळी (पीपी, एफआयबीसी, पीपी ट्रे) 
पॅकेजिंग घटकांची निवड करताना त्याचा थर, जाडी, जीएसएम, घनता, तन्यता, उपयोगिता, पारदर्शकता, दृश्‍यमानता, पर्यावरणपूरकता या गोष्टींची तपासणी केली जाते.याचबरोबरीने घटक किती प्रमाणात आर्द्रता शोषतात याचाही विचार केला जातो.
  1. पॅकिंगसाठी विविध गुणवत्तेच्या पेपर पिशव्या उपलब्ध आहेत. यामध्ये पर्यावरणपुरक घटकांचा वापर केला जातो. विविध थर असलेले पाऊच पॅकिंगसाठी वापरले जातात. पाऊचसाठी विशिष्ट गुणवत्तेचे प्लॅस्टिक वापरणे बंधनकारक असते.
  2. मोल्डेड ट्रे, प्लॅस्टिक वर्गातील कंटेनर उपलब्ध आहेत.
  3. शेतमालाचा विचार करून मोठ्या आकाराच्या पिशव्या वापरल्या जातात. या पिशव्यांची साठवणक्षमता दोनशे किलोच्या पुढे असते.

पॅकेजिंग साहित्य

  1. धान्य, डाळी यांच्या पॅकिंगसाठी किरकोळ बाजारात शक्‍यतो पिशव्यांचा वापर केला जातो. घाऊक बाजारपेठेत धान्य ताग पिशव्या किंवा विणलेल्या पिशव्यांमध्ये भरले जाते.
  2. नैसर्गिक स्थितीत भाजीपाला वाहतूक ही ताग पिशव्या किंवा प्लास्टिक क्रेटमध्ये केली जाते.
  3. दुग्धजन्य पदार्थ जसे की दही,चीज यांचे प्लॅस्टिक कंटेनरमध्ये पॅकिंग केले जाते. दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी स्वतंत्र नियमावली आहे. त्या गुणवत्तेनुसार पॅकेजिंग करावे लागते.
  4. आपल्याकडे अजूनही फळाचे पॅकिंग हे तागाच्या पिशव्या, वेताच्या टोपल्या, लाकडी कंटेनर, सीएफबी बॉक्‍समध्ये केले जाते.
  5. सुकामेवा, केळी यांच्या पॅकिंगसाठी सीएफबी बॉक्‍स वापरतात.
  6. "रेडी टू इट' प्रकारचे खाद्य पदार्थ, कोरड्या वनौषधी, मसाले हे प्लॅस्टिक पाऊचमध्ये पॅकिंग करतात.
  7. वनस्पतीचे अर्क, फळांचे ज्यूस हे काच, प्लॅस्टिकच्या बाटल्या, मेटल कंटेनरमध्ये पॅक करतात.
  8. जॅम, जेली, मधाचे पॅकिंग हे प्लास्टिक कंटेनर, काच कंटेनर, थर्मोफॉर्मड कंटेनरमध्ये करतात. लोणचे काचेच्या बाटलीमध्ये पॅक केलेले असते.
  9. फुलांची वाहतूक "अपेडा'ने शिफारशीत केलेल्या बॉक्‍समधून करणे अपेक्षित आहे.

पॅकेजिंगवरील मजकूर

पॅकिंगवर घटकाच्या गुणवत्तेनुसार हिरवी किंवा लाल खूण केलेली असते. पॅकिंग केलेल्या घटकाचा तपशील दिलेला असतो. घटकाचे प्रमाण, बार कोडिंग हा तपशील महत्त्वाचा आहे.

पॅकिंगसाठी "बीआयएस' नियमांचे पालन करणे आवश्‍यक असते. 

ई-मेल - shaileshjayawant@gmail.com 
(लेखक पॅकेजिंग उद्योगातील तज्ज्ञ आहेत)
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment