सध्या अनेक शेतकरी, रोपवाटिकाधारक शहरी भागातील विविध रोपांची मागणी पुरवून फायदा मिळवत आहेत. त्याला बोन्साय किंवा वामनवृक्ष निर्मितीची जोड दिल्यास व्यवसायात वृद्धी होऊन फायद्यात वाढ होऊ शकते.
निसर्गामध्ये पाण्याचा अभाव, अन्नद्रव्यांची कमतरता यासारख्या स्थितीमध्ये वाढणाऱ्या झाडांची वाढ खुंटते. सुरावतीच्या काही वर्षांमध्ये झाडांची खुंटलेली वाढ अनेक वर्षांनंतरही खुंटलेलीच राहते. या प्रकारातून नैसर्गिकरीत्या ‘बोन्साय’ची निर्मिती झाली असावी. बोन्साय हा जपानी शब्द असून, मराठीमध्ये त्याला वामनवृक्ष असे म्हणता येईल.
जपानमधील ‘बोन्सायनिर्मिती’
- या तंत्राची सुरवात बाराव्या शतकात झाल्याचे मानले जाते. प्रत्येक वस्तूस लहान रूप देण्याच्या स्वाभाविक जपानी प्रवृत्तीतून विकसित झाले असावे.
- या तंत्राचा प्रसार जगभरामध्ये खऱ्या अर्थाने दुसऱ्या महायुद्धानंतरच झाला. अमेरिकेपाठोपाठ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत व अन्य देशांत ही वामनवृक्ष कला विकसित होत गेली.
- पाश्चात्त्य देशांत या कलेबाबत अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत.
बोन्सायची लागवड
- बोन्साय निर्मितीसाठी निसर्गातून गोळा केलेली, रोपवाटिकातून मिळवलेली, बियांपासून तयार केलेली, छाट कलमापासून, गुटी कलमापासून किंवा दाब कलमापासून तयार केलेली रोपे वापरता येतात.
- या रोपांची कुंडीमध्ये लावण्याची क्रिया किंवा कुंडीतील लावलेले रोप काढून ते बोन्सायसाठीच्या खास आडव्या आकाराच्या कुंड्या किंवा तबकात घेण्याच्या क्रियेस रोपण क्रिया असे मानले जाते.
- साध्या कुंडीतील साधारणतः एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे रोप निवडावे.
तबक किंवा कुंडीची निवड
- प्रथम वामनवृक्ष तबकाची निवड करणे आवश्यक असते.
- वामनवृक्ष तबकाच्या तळभागात पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्रे पाडावे.
- छिद्रामधून माती व मुळे बाहेर पडू नयेत, यासाठी जाळी लावून घ्यावी,
- रोप हलू नये व रोपास आकार देण्यासाठी तारेचा वापर करावा.
- या तबकात तळाशी जाड माती व विटांचे बारीक तुकडे, मध्यम भागात खतमिश्रित मध्यम माती, वरील भागात खतमिश्रित बारीक माती टाकून कुंडी तयार करावी.
बोन्सायचे शास्त्र
रोपांच्या वाढीच्या काळामध्ये वेळोवेळी मुळांची छाटणी, अनावश्यक फांद्या - उपफांद्या, पानांची छाटणी केली जाते.
- मातीच्या पृष्ठभागावर शेवाळाचा उपयोग व रोपण केल्यानंतर शोषण पद्धतीने पाणी दिले जाते. अधिक वाढणाऱ्या मुळांना कापून त्यांना गरजेपुरतीच पोषक अन्नद्रव्ये दिली जातात. त्याद्वारा झाडांची वाढ आणि आकार यावर नियंत्रण ठेवावे.
- ज्या वनस्पतींची वाढ अतिशय जोमाने होते, अशा प्रकारच्या वामनवृक्षाचे वर्षातून एकदा पुनर्रोपण आवश्यक असते.
- ज्या वनस्पतींची वाढ सावकाश होते, अशा प्रकारच्या वामनवृक्षाचे पुनर्रोपण तीन-चार वर्षांनी केले तरी चालते. पिंपळ, उंबर, पिंपर्णी, वड यांसारख्या वनस्पतींचे पुनर्रोपण केल्यानंतर त्यांची पूर्वीची पाने झडून जातात. मात्र काही दिवस, महिन्यांतच त्यांना नवीन फुटवे येतात. पाने गळाल्यानंतरही अशा वामनवृक्षांना नियमितपणे पाणी देणे आवश्यक आहे.
बोन्सायची कला
- केवळ वर्षानुवर्षे झाडे केवळ कुंड्यांमध्ये वाढवणे व त्यांची वाढ खुंटविणे याला बोन्साय म्हणता येत नाही. निसर्गाचा समतोल साधत पूर्ण वाढलेल्या वृक्षाची हुबेहूब लघू स्वरूपातील एक प्रतिकृती तयार करण्याला बोन्सास म्हणता येते. त्यामध्ये झाडाचे खोड, फांद्या - उपफांद्या व पाने, फुले, फळे हे एकमेकांसोबत प्रमाणबद्ध अवस्थेत असणे आवश्यक असतात.
- एखाद्या कसलेल्या चित्रकाराने काढलेल्या हुबेहूब चित्राप्रमाणे बोन्सायचे स्वरूप असले पाहिजे. तबकातील वृक्षासोबत त्याच्या बाजूचा देखावाही जिवंत रोपे व अन्य साधनांनी तयार करावा लागतो.
वाढत्या शहरीकरणाने वाढताहेत संधी
- वाढत्या शहरामध्ये मोठ्या झाडांचे प्रमाण कमी होत आहे. केवळ शोभेच्या झाडांचे, झुडपांचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी निसर्गाच्या जवळ जाण्याची वृत्ती माणसामध्ये वाढत आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे.
- रोपवाटिकाधारकांनी बोन्साय निर्मितीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन विविध वृक्षांचे बोन्साय तयार केल्यास प्रचंड मागणी आहे.
या झाडांचे करता येईल बोन्साय
महाराष्ट्रात आढळणाऱ्या अशोक, आपटा, उंबर, अंजीर, वड, पिंपळ, आपटा, पिपरी, शेवगा या झाडांचे बोन्साय तयार करता येतात.बोन्सायचे फायदे
- बोन्साय निर्मिती करून त्याची विक्री केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. साध्या रोपांची विक्री दहा रुपयाला होत असेल, तर त्यांच्या बोन्सायची विक्री वयानुसार, सौंदर्यानुसार काही हजारांपासून सुरू होते. विविध प्रकारच्या वास्तुशास्त्रामुळे प्रमाणित झाडांना मागणी आहे.
- प्राचीन भारतात आयुर्वेदाचार्य दुर्मिळ आणि बहुउपयोगी वृक्षांचे संकलन करून त्या जतन करण्यासाठी या कलेचा वापर करीत होते.
- कमी जागेमध्ये दुर्मिळ व अन्य देशांतील जातींच्या वनस्पती वाढविणे शक्य आहेत.
- घरातील व घराच्या बागेतील शोभा वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या वृक्षांचा वापर होतो.
- वामनवृक्षाच्या एकत्रित परिणामातून एक आकर्षक, मनमोहक दृश्य निर्माण होते. घरातील शोभा वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
- जपानमध्ये काही वृक्षांचे संगोपन वंशपरंपरेतून झाले आहे. अंदाजे ६०० ते ८०० वर्षे वयोमानाची बोन्साय झाडे जपली गेल्याने त्यांना एक ऐतिहासिक महत्त्व आहे.
- वामनवृक्षाची तुलना एक उत्कृष्ट कलाकृतीशी किंवा एका सुंदर चित्राशी किंवा शिल्पाशी करता आल्यामुळे आज संपूर्ण विश्वात वामनवृक्ष जोपासण्याचा छंद दिवसेंदिवस वाढत आहे.
प्रा. श्रीकांत ध. कर्णेवार, ९४२२३ ०२५६९
(लेखक कृषी महाविद्यालय, बारामती येथे कार्यरत आहेत.)
0 comments:
Post a Comment