दुग्धजन्य पदार्थांसाठी पॅकेजिंग घटक निवडताना मूळ पदार्थ आणि पॅकेजिंग घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. बाजारपेठेची गरज ओळखून पॅकेजिंग करावे.
खवा
- पीएफए कायद्यानुसार खवा टिकविण्यासाठी कुठलाही पदार्थ वापरण्यास बंदी आहे. यामुळे खवा पॅकिंगला महत्त्व आहे.
- ऍल्युमिनिअम फॉईल आणि एलडीपीई प्रकारच्या पॉलिथिनमध्ये खवा पॅक करून तो 13 ते 15 अंश सेल्सिअस तापमानास ठेवल्यास 14 दिवसांपर्यंत टिकवता येतो.
- लॅमिनेट्सचा वापर खवा पॅकिंगसाठी करतात. दोनपेक्षा जास्त किंवा तीन ते सात थर (वेगवेगळ्या पॅकेजिंग मटेरिअलचे) मिळून लॅमिनेट्स तयार केले जातात.
- पेपर, ऍल्युमिनिअम फॉईल, एलडीपीई (लो डेनसिटी पॉलिइथिलीन) फिल्म अशा प्रकारच्या लॅमिनेटमध्ये खवा पॅकिंग केल्यास ते पॅकेट 37 अंश सेल्सिअस तापमानास ठेवल्यास दहा दिवसांपर्यंत, तर हेच पॅकेट रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास 60 दिवसांपर्यंत खवा चांगला टिकतो.
- पॉलिइथिलीनमध्ये खवा पॅक करून 7+1 अंश सेल्सिअस तापमानास ठेवल्यास टिकण्याची क्षमता 25 दिवसांपर्यंत असते.
बर्फी, पेढा
- बर्फी गरम अवस्थेत निर्जंतुक केलेल्या पॉलिस्टर टब (250 ग्रॅम) मध्ये भरून मल्टिलेअर नायलॉन पाऊचमध्ये हवाबंद पॅकिंग केल्यास 30 अंश सेल्सिअस तापमानास 52 दिवसांपर्यंत टिकते. बर्फी हवाबंद पॅकिंग न करता 30 अंश सेल्सिअस तापमानास साठवल्यास 16 दिवसांपर्यंत चांगल्या स्थितीत राहते.
- सर्वसाधारण पॅकेजमध्ये साधारण तापमानाला पेढा (25 ते 30 अंश सेल्सिअस) दोन आठवड्यांपर्यंत टिकू शकतो.
- निर्जंतुक केलेल्या श्रिंक रॅपमध्ये तीन आठवड्यांपर्यंत पेढे टिकतात. कार्डबोर्डमध्ये (आतून पर्ल फिल्म) पाच अंश सेल्सिअस तापमानास पेढे 30 दिवसांपर्यंत टिकवता येतील.
रसगुल्ला, गुलाबजाम
- बाजारपेठेत टीन कॅन्समध्ये रसगुल्ला, गुलाबजाम मिळतात. परंतु हे कॅन्स आतून लॅकर्ड (हवाबंद राहण्यासाठी) असावेत. यामुळे दुग्धजन्य पदार्थ खराब होणार नाहीत. गुलाबजाम, रसगुल्ला या प्रकारच्या कॅनमध्ये साधारण तापमानाला 180 दिवसांपर्यंत टिकतात.
- पॉलिस्टरीन कपमध्ये पॅकिंग केलेले गुलाबजाम पाच अंश सेल्सिअस तापमानास 30 दिवसांपर्यंत राहू शकतील.
- रसगुल्ले टिनमध्ये पॅक करताना रसगुल्ला व साखरेच्या पाकाचे प्रमाण 40-60 ठेवल्यास व रसगुल्ले गरम अवस्थेत निर्जंतुक टीनमध्ये भरल्यास (पदार्थ तापमान 90 अंश सेल्सिअस) सहा महिन्यांपर्यंत चांगले राहतात.
डॉ. ए. एम. चप्पलवार, डॉ. एस. एन. शिंदे
संपर्क - डॉ. अ. मा. चप्पलवार,9420788302
(लेखक पशुजन्य पदार्थ प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी येथे कार्यरत आहेत.)
संपर्क - डॉ. अ. मा. चप्पलवार,9420788302
(लेखक पशुजन्य पदार्थ प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी येथे कार्यरत आहेत.)
0 comments:
Post a Comment