खवा निर्मिती तंत्र

खव्यापासून बर्फी, पेढा, गुलाबजामून, कलाकंद, कुंदा इ. पदार्थ तयार करता येतात. खवा बनविण्याच्या पारंपरिक पद्धतीत मंद आचेवर दूध तापवत ठेवून सतत ते हलवत राहावे लागते. दूध चांगले घट्ट झाल्यावर तापमान 80 ते 88 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आणले जाते. जेव्हा खवा कढईचा आजूबाजूचा व तळाचा भाग सोडेल आणि एकत्र चिकटू लागेल तेव्हा खवा तयार झाला असे समजावे. पण या पद्धतीत वेळ जास्त लागतो.

खवानिर्मिती यंत्र

खवानिर्मिती यंत्र हे गॅस मॉडेल व डिझेल मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. बहुतांशी ठिकाणी गॅस मॉडेलचाच वापर होतो. हे यंत्र वेगवेगळ्या क्षमतेचे आहे. यंत्र खरेदी करताना "जार क्षमता' ध्यानात न घेता जास्तीत जास्त किती व कमीत कमी किती खवा बनविता येईल याचा विचार करावा. 
खवा बनविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस 60 ते 70 मिनिटे लागतात. प्रति किलो खव्यास नऊ ते दहा रु. खर्च (गॅस, वीज) येतो. डिझेल मॉडेलसाठी हा खर्च 16 ते 17 रु. प्रति किलो एवढा येतो. या यंत्रामध्ये मोठे गोलाकार भांडे 0.5 एच.पी. मोटारच्या साह्याने गोल फिरते. भांड्यातच असणाऱ्या दोन स्क्रॅपरच्या साह्याने दूध भांड्याच्या पृष्ठभागास व कडेस लागत नाही. फक्त आचेवर नियंत्रण ठेवावे लागते. मोठ्या चौकोनी चमच्याने (सुपडी) दूध खाली-वर करावे लागते. भांड्याला नळ जोडला असल्यामुळे दूध गरम करणे किंवा बासुंदी, खीरसाठी दूध आटवणे या गोष्टीही सहज होतात.

खवा तयार करताना

* खव्यासाठी निर्भेळ दूध वापरावे. 
* गाईच्या एक लिटर दुधापासून 170 ते 190 ग्रॅम खवा मिळतो. 
* म्हशीच्या एक लिटर दुधापासून 200 ते 220 ग्रॅम खवा मिळतो. 
* दुधाची आम्लता 0.14 ते 0.15 टक्का इतकी असावी. 
* दुधात फॅट कमी असल्यास खवा कोरडा बनतो. 
* दुधात भेसळ असल्यास खवा कठीण बनतो. 
* म्हशीच्या दुधापासूनचा खवा पांढरट, तपकिरी छटा असलेला, किंचित तेलकट पृष्ठभाग मृदू, मुलायम, दाणेदार किंचित गोड असा असतो. 
* गाईच्या दुधापासूनचा खवा फिक्कट पिवळा, तपकिरी छटा असलेला, ओला पृष्ठभाग, किंचित कठीण, खारट असतो. 

संपर्क - 9405794668 
डॉ. धीरज कंखरे, कृषी महाविद्यालय, धुळे
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment